ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. लवासा पुढील महिन्यात फिलिपाईन्सस्थित एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या (एडीबी) उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.
लवासा हे 1980 च्या बॅचचे निवृत्त आयएएस अधिकारी होते. मुख्य निवडणूक आयुक्त होण्याचे ते दावेदार होते. त्यांचा निवडणूक आयोगाचा कार्यकाळ अद्याप बाकी होता. 23 जानेवारी 2018 रोजी त्यांनी भारताच्या निवडणूक आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. ऑक्टोबर 2022 मध्ये ते मुख्य निवडणूक आयुक्तपदावरून सेवानिवृत्त होणार होते. मात्र, आता ते एडीबीचे उपाध्यक्षपद भूषवतील.
एशियन डेव्हलपमेंट बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, एडीबीने अशोक लवासा यांची खासगी क्षेत्रातील कामकाजासाठी आणि सार्वजनिक खासगी भागीदारीसाठी बँकेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. दिवाकर गुप्ता यांची जागा ते घेतील. गुप्ता यांचा कार्यकाळ 31 ऑगस्टपर्यंत आहे.
निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती होण्यापूर्वी लवासा केंद्रीय अर्थ सचिव म्हणून निवृत्त झाले. यापूर्वी ते पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे केंद्रीय सचिवही होते.