वार्ताहर / खोची
कुंभोज ता. हातकणंगले जिल्हा परिषद मतदारसंघातर्गत येणाऱ्या सात गावातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. या सातपैकी ज्या गावची निवडणूक बिनविरोध होईल. त्या गावाच्या विकासासाठी पंधरा लाख रुपयांचा जादा निधी देणार असल्याची ग्वाही कोल्हापूर जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती प्रवीण यादव यांनी दिली.
गाव पातळीवरील नेत्यांनी निवडणूक बिनविरोध करून एक वेगळा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले. गावागावात सामाजिक सलोखा निर्माण व्हावा, इर्षा, द्वेष कमी व्हावेत, निवडणुकीत होणाऱ्या खर्चाला पायबंद घालून निवडणूक बिनविरोध करून मतदारसंघाचे नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवावे, असे आवाहन त्यांनी केले. कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातंर्गत खोची, बुवाचे वठार, लाटवडे, मिणचे, कुंभोज, दुर्गेवाडी, नेज या सात ग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ज्या गावची निवडणूक बिनविरोध होईल त्यांना विकासकामांसाठी पंधरा लाखांचा जादा निधी देण्यात येणार आहे.