रविवारी सकाळी राजभवनातील ग्लास हाऊसमध्ये शपथविधी कार्यक्रम
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्याचे नवनियुक्त राज्यपाल थावरचंद गेहलोत रविवार दि. 11 जुलै रोजी पदभार स्वीकारणार आहेत. बेंगळूरमधील राजभवन येथील ग्लास हाऊसमध्ये सकाळी 10ः30 वाजता ते शपथबद्ध होतील. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अभय ओक हे नूतन राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील.
राज्याचे मावळते राजपाल वजुभाई वाला यांचा कार्यकाळ संपून दोन वर्षे उलटली आहेत. तरी सुद्धा त्यांच्या जागी नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली नव्हती. त्यामुळे तेच या पदाची जबाबदारी सांभाळत होते. चार दिवसांपूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी थावरचंद गेहलोत यांना कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्त केले होते.
थावरचंद गेहलोत यांचा जन्म 18 मे 1948 रोजी मध्यप्रदेशातील उज्जैन येथील रुपेट येथे झाला. त्यांनी उज्जैन विद्यापीठातून बी. ए. पदवी संपादन केली आहे. 1962 मध्ये त्यांनी जनसंघातून राजकारणात प्रवेश केला. भाजपमध्ये संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीसह अनेक पदांची जबाबदारी त्यांनी सांभळली आहे. भाजपचे राष्ट्रीय मुख्य सचिव असताना 2006 ते 2014 या दरम्यान कर्नाटकासह अनेक राज्यांचा पक्षप्रभारी म्हणून काम केल्याचा त्यांना अनुभव आहे.
कर्नाटकाचे 19 वे राज्यपाल
मध्यप्रदेश विधानसभेवर ते तीन वेळा निवडून आले होते. 1996 पासून 2009 पर्यंत शाजापूर लोकसभा मतदारसंघातून चार वेळा त्यांनी संसदेत प्रवेश केला आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांना 2012 मध्ये राज्यसभेवर निवडून आणण्यात आले होते. त्यांच्या राजकीय अनुभवाचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सामाजिक न्याय आणि सबलिकरण खात्याची धुरा सोपविण्यात आली होती. त्यांनी नुकताच राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आता 11 जुलै रोजी ते कर्नाटकाचे 19 वे राज्यपाल म्हणून जबाबदारी हाती घेणार आहेत.