प्रतिनिधी /सांगे
गोव्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या नेत्रावळी येथील नेत्रावळी सहकारी दुग्ध व्यावसायिक संस्थेला गोव्यातील दूध संकलनात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. याबद्दल नेत्रावळीतील दूध उत्पादकाकडून संस्थेचे अभिनंदन करण्यात येत आहे. गोवा राज्य दूध उत्पादक संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात घेण्यात आलेल्या राज्यातील ‘उत्कृष्ट दूध संकलन संस्था’ स्पर्धेत एकूण 181 दूध सोसायटय़ांमधून नेत्रावळी सहकारी दुग्ध व्यावसायिक संस्थेला हा मान मिळाला आहे.
गोवा डेअरीच्या दूध प्रक्रिया प्रकल्पाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात दामोदर मोरजकर (चिफ एक्झिक्युटिव्ह-खादी), गोवा डेअरीचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर, डॉ. अनिल फडते, सुवर्णमहोत्सवी समिती अध्यक्ष नितीन कोळवेकर यांच्या हस्ते हे बक्षीस प्रदान करण्यात आले. 1972 साली उदयास आलेल्या नेत्रावळी सहकारी दुग्ध व्यावसायिक संस्थेला पुढील वषी 50 वर्षे पूर्ण होणार आहेत. या संस्थेचे सचिव सदानंद व्ही. गावकर हे 2009 पासून धुरा सांभाळत आहेत. या संस्थेच्या यशस्वी वाटचालीत माजी अध्यक्ष म्हाळगो गावकर व आजवरच्या संचालक मंडळांचे भरीव योगदान आहे. पूर्वी संस्थेचा ऑडिट दर्जा चांगला नव्हता. मात्र गेल्या आठ वर्षांपासून ‘अ’ दर्जा प्राप्त झालेला आहे.
गेल्या वर्षापासून निवडणूक होऊन प्रसाद भिकू गावकर हे सोसायटीचे अध्यक्ष म्हणून कारभार पाहत आहेत. तसेच कार्यकारी समिती सदस्य म्हणून रोहिदास गावकर, मीना गावकर, रजनी वेळीप, गुरुदास तो. गावकर, सुभाष सा. वेळीप, सर्वेश मंडवळ, संतोष वेळीप, मनोज गावकर यांचा समावेश आहे. नेत्रावळी भागातील ही प्रमुख दूध संस्था असून यापूर्वी अनेक बक्षिसे तिने प्राप्त केली आहेत. सभासदांचे हित जपणारी संस्था म्हणून ती प्रसिद्ध असून सरकार आणि गोवा डेअरीने नेत्रावळीवर भर दिल्यास दूध उत्पादन वाढविण्यास खूप वाव आहे.