– हैद्राबाद येथील ठकसेनास अटक
प्रतिनिधी/कोल्हापूर
नोकरी लावण्याचे अमिष तसेच सोन्याच्या कर्जावर चांगला परतावा देण्याच्या अमिषाने 4 जणांची 18 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी मिर सरफराज अली (वय 48 रा. जिल्हा हैद्राबाद, राज्य तेलंगणा) याला जुना राजवाडा पोलीसांनी अटक केली. याबाबतची फिर्याद पूनम संजय अतिग्रे (वय 47 रा. मंगळवार पेठ) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, लॉकडाऊन काळात व्यापार बंद असताना संशयित मिर सरफराज अली याने पूनम अतिग्रे यांच्यासोबत ओळख केली. पूनम यांचा मुलास नोकरी लावतो असे सांगून सरफराजने अतिग्रे कुटूंबियांकडून 12 लाख रुपये उकळले. तसेच गोल्ड लोनवर आकर्षक परतावा देण्याचे आमिषही दाखविले होते. यासाठी वेगवेगळया बँकेत सोने गहाण ठेवून गोल्डलोनची रक्कमही परस्पर हडपल्याची तक्रार फसवणूक झालेल्या कुटुंबाने जुना राजवाडा पोलिसांत केली आहे. तसेच सुधिर कानडे यांची 1 लाख, रामचंद्र म्हेतर 1 लाख, विशाल संकपाळ 70 हजार, मोहन चाचे 1 लाख 30 रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पूनम अतिग्रे यांच्यासह सर्वांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात 27 फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली. यानुसार मिर सरफराज अली याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. मंगळवारी त्याला अटक करण्यात आली.