युवकाची दहिवडी पोलीसात तक्रार : तीन संशयितांवर गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ सातारा
सध्या कोरोना स्थितीत बेरोजगारी वाढली असून नेमका या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही व्यक्ती ऑनलाईन फसवणूक करत आहेत. असाच प्रकार वावरहिरे, ता. माण येथील एका युवकाला नोकरी लावण्याचे अमिष दाखवत त्याचा विश्वास संपादन करुन त्याच्याकडून 80 हजार 540 रुपये घेत त्याला गंडा घालणाऱया अनोळखी तिघांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत केवल कुंडलिक कचरे (वय 22, रा. वावरहिरे) याने दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 ते 30 ऑगस्ट या कालावधीत येथील तान्या शर्मा, सान्या, एच आर सुमित सिंग (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) या तिघांनी संगनमत करुन केवल कचरे यास एअर ऑथॅरिटी इंडियामध्ये बॅक ऑफिसमध्ये नोकरी लावण्याचे अमिष दाखवले. त्याची मुलाखत घेवून त्याला ट्रेनिंग लेटर, जॉयनिंग लेटर, ऑफर लेटर देत त्याचा विश्वास संपादन करुन त्याला 80 हजार 540 रुपये त्यांच्या बँक खात्यावर भरण्यास सांगितले.
मात्र, त्यानंतर कचरे याने त्यांना फोन लावला असता त्याचा फोन घेण्यास संशयितांनी टाळाटाळ सुरु केल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. युवकाने दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तीन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्हय़ाचा पुढील तपास हवालदार एम. जे. राऊत करत आहेत.