24.59 लाख टन तेलाची आयात
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नोव्हेंबर-डिसेंबर 2020 च्या कालावधीत वनस्पती तेलाच्या आयातीत 9 टक्के इतकी वाढ झाली आहे. सदरच्या कालावधीत 24.59 लाख टन इतक्या वनस्पती तेलाची आयात करण्यात आली आहे. तर याच तुलनेत नोव्हेंबर-डिसेंबर 2019 मध्ये 22.55 लाख टन तेलाची आयात करण्यात आली होती. खाद्यतेल व्यापारी वर्ष नोव्हेंबर ते ऑक्टोबरपर्यंतचे गणले जाते.
डिसेंबरमध्ये खाद्य तेल आयात वाढून 13 लाख 28 हजार 161 टनावर पोहचले आहे. 2019 मध्ये याच कालावधीत 11 लाख 7 हजार 380 टन तेलाची आयात करण्यात आली होती. नोव्हेंबर-डिसेंबर 2020 कालावधीत 12,900 टन रिफाइंड तेलाची आयात केली गेली, जी मागच्या वर्षी समान कालावधीत 2 लाख 17 हजार 225 टन इतकी होती. पामोलीन तेलावर निर्बंध लादले गेल्याने या तेलाच्या आयातीवर मर्यादा आल्या आहेत. भारत सध्या फक्त कच्च्या तेलाचीच आयात करतो आहे. नोव्हेंबर-डिसेंबर 2020 मध्ये भारताने 23 लाख 98 हजार 590 टन इतक्या कच्च्या तेलाची आयात केली आहे तर 2019 मध्ये ही आयात 19 लाख 90 हजार 579 टन इतकी होती.