प्रतिनिधी / बेळगाव :
कोरोनामुळे सर्वत्रच दिवसेंदिवस भितीचे वातावरण पसरूलागले आहे. न्यायाधिशांना आणि वकीलांनांही कोरोनाची लागण राज्यात झाल्याने उच्च न्यायालयाने पुन्हा गांभीर्याने लॉकडाऊन पाळण्याचे आदेश जिल्हा न्यायालयांना बजावले आहेत. न्यायाधिश असोत किंवा वकील वाहने पार्किंग न्यायालयाच्या आवारात करायचे नाही असा आदेश दिल्यामुळे बेळगाव न्यायालयामध्ये मोठा गोंधळ उडाला. रस्त्यावरच वाहने पार्किंग केल्यामुळे वाहतुकीचीही कोंडी झाली. यामुळे वकील वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
आम्हाला पार्किंगची सोय करा त्यानंतर हा फतवा काढा अशा प्रतिक्रिया वकीलांनी यावेळी दिल्या. गेल्या 3 महिन्यापासून न्यायालयीन कामकाज पूर्णपणे बंद आहे. केवळ महत्वाचे खटले निकालात काढले जात आहेत. त्या व्यतिरिक्त इतर न्यायालयीन कामकाज थांबविण्यात आले आहे. न्यायालयामध्ये न्यायाधिश आणि वकीलांना प्रवेश देण्यात येत आहे. त्या व्यतिरिक्त पक्षकार किंवा इतर कोणालाही प्रवेश देण्याचे बंद करण्यात आले होते.
त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे सुरू होती. मात्र आता न्यायालयाच्या आवारातच वाहने पार्किंग करायची नाहीत. असा उच्च न्यायालयाने आदेश दिल्यामुळे पार्किंगची समस्या गंभीर बनत चालली आहे. जिल्हा न्यायालयासमोर आणि प्रादेशिक आयुक्त कार्यालयासमोर दुचाकी व चारचाकी वाहने पार्किंग केल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. रहदारी पोलीसांनी तातडीने दाखल होऊन काही प्रमाणात वाहतुकीची कोंडी दूर केली.
अशाप्रकारे नियम काढल्यास काम करणे अवघड जाणार आहे. आम्ही सर्व नियम पाळत आहे. मात्र आम्हाला वाहने पार्किंग करण्यासाठी पर्यायी जागा द्यावी अशी मागणी वकीलांनी केली आहे. जनरल सेपेटरी आर. सी. पाटील यांच्यासह इतर वकीलांनी नाराजी व्यक्त केली आहे.