वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
कोरोना महामारी संकटामुळे आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील सर्व टेनिस स्पर्धा लांबणीवर किंवा स्थगित केल्या आहेत. गेल्या मार्चपासून जवळपास दोन महिने संपूर्ण आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा बंद ठेवण्यात आल्या आहेत. आता न्यूझीलंडमध्ये पुढील महिन्यात पुरूषांची प्रिमियर लीग टेनिस स्पर्धा घेतली जाणार आहे.
ऑकलंडमध्ये 3 जूनपासून 24 टेनिसपटूंचा सहभाग असलेल्या पुरूषांच्या प्रिमियर लीग टेनिस स्पर्धेला प्रारंभ केला जाणार आहे. सदर स्पर्धा तीन आठवडे चालणार आहे. या स्पर्धेत तीन गटामध्ये सामने खेळविले जातील. एटीपी टूरवरील वयस्कर आणि न्यूझीलंडमधील काही नवोदित टेनिसपटूमध्ये हे सामने खेळविले जाणार असल्याची माहिती टेनिस न्यूझीलंडचे संचालक लँबर्ट यांनी दिली. ब्रिटनचा 77 वा मानांकित टेनिसपटू कॅमेरून नुरी या स्पर्धेत भाग घेणार आहे. तसेच न्यूझीलंडच्या डेव्हिस चषक संघातील काही खेळाडूंचा यामध्ये समावेश राहील.