मुंबई/प्रतिनिधी
राज्याच्या माजी महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांना अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत पाच वर्षांपूर्वी झालेल्या निकृष्ट दर्जाच्या चिक्की वाटप गैरव्यवहारात खासगी पुरवठादारांवरती अजूनही एफआयआर का दाखल केलेला नाही, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. परंतु त्याचा पंकजा मुंडे यांच्याशी काहीएक संबंध नसून या प्रकरणाविषयीचे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना विधानसभेत दिले होते. त्यामुळे दुसऱ्यांनी केलेल्या कृत्याचा आरोप थेट मंत्र्यावर करणे योग्य नाही. शिळ्या कढीला ऊत आणण्याचे काम सत्ताधारी करत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.
माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा बचाव करताना प्रवीण दरेकरांनी सत्ताधारी चिक्की वाटप गैरव्यवहारात शिळ्या कढीला ऊत आणण्याचे काम करत आहेत असा आरोप केला. दरम्यान, पंकजा यांच्या काळातील कथित चिक्की वाटप घोटाळा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अजूनही खासगी पुरवठादारांवर एफआयआर दाखल का केला नाही? अशी विचारणा केली आहे. यावर बोलताना दरेकर म्हणाले की, एखाद्या गोष्टीत मंत्र्याचा थेट हस्तक्षेप होऊन जर घोटाळा झाला असेल तर आरोप करता येतात. पण प्रशासकीय कंत्राटदाराकडून गैरव्यवहार झाले असतील तर त्याला ते जबाबदार असतात. त्यामुळे मंत्र्याची चूक नसताना त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नसल्याचे दरेकर यांनी सांगितले.