ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबचे उच्च शिक्षण मंत्री तृप्त राजिंदर सिंह बाजवा यांचे कोरोनाचे पहिले रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर त्यांना थोडा दिलासा मिळाला होता. पण मंगळवारी रात्री आलेले त्यांचे दुसरे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.
याआधी देखील राज्यातील अनेक उच्च अधिकाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत. पण राज्य सरकारच्या मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची पहिलीच घटना आहे. त्यामुळे पंजाब सरकारमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 10 जुलै रोजी कॅबिनेट मंत्री राजिंदर सिंह बाजवा यांनी आपली कोरोना टेस्ट केली होती. जेव्हा आपल्या विभागातील अनेक उच्च अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत एक अधिकारी पॉझिटिव्ह आढळला होता. बाजवा यांनी 10 जुलै रोजी केलेल्या टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. या दरम्यान राज्याचे आरोग्य मंत्री बलवीर सिंह सिद्धू यांचे देखील कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.
दरम्यान, बाजवा यांची तब्येत मागील काही दिवसांपासून अस्वस्थ होती. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा कोरोनाची टेस्ट करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानंतर बाजूला यांच्या दुसऱ्या टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर बाजवा यांच्या खाजगी स्टाफ ची तपासणी सुरू करण्यात आली आहे. स्टाफ च्या सर्व सदस्यांना लवकरच क्वारंटाइन केले जाण्याची शक्यता आहे. तर बाजवा यांना मोहाली मधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बाजवा यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी एक ट्विट करत त्यांना लवकरात लवकर ठीक होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, माझ्या मंत्रिमंडळातील माझे सहयोगी तृप्त राजिंदर सिंह बाजवा यांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ते लवकरात लवकर पूर्ण पणे तंदुरुस्त व्हावेत अशी प्रार्थना करतो.