ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
आज देशात ठिकठिकाणी ओणम सणाचा उत्साह दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशवासियांना ओणम सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एका ट्वटिमध्ये पंतप्रधान म्हणाले की, सकारात्मकता, चैतन्य, बंधुभाव आणि सौहार्दाशी संबंधित ओणम सणानिमित्त शुभेच्छा. सर्वांच्या उत्तम आरोग्य आणि कल्याणासाठी मी प्रार्थना करतो.
ओणम हा केरळचा अत्यंत लाडका सण आहे. शेतकरी हा दिवस अत्यंत उत्साहाने साजरा करतात. तब्बल 10 दिवस हा सण साजरा केला जातो. 12 ऑगस्टपासून या सणाला सुरुवात झालीय आणि आज 21 ऑगस्ट रोजी ओणमचा मुख्य पर्व साजरा केला जात आहे. 23 ऑगस्ट रोजी या सणाची सांगता होईल. ओणमच्या निमित्ताने सजवलेले हत्ती, छोटय़ा मोठय़ा रंगवलेल्या सजवलेल्या होडय़ा, संगीत आणि पारंपरिक नृत्य अशी अनेक दृश्ये दिसतात.