केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची घोषणा, पंजाब सरकारकडूनही चौकशी समिती, सर्व स्तरांमधून तीव्र प्रतिक्रिया
आरोप-प्रत्यारोपांचा वर्षाव
- पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी प्रकरणाचे तीव्र पडसाद
- सर्वसामान्य जनतेची संतप्त भावना, राजकीय आरोप-प्रत्यारोपांना ऊत
- पंजाब पोलिसांना माहिती दिली असल्याचा केंद्र सरकारकडून पुनरुच्चार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींच्या प्रकरणी केंद्र सरकार लवकरच मोठा आणि कठोर निर्णय घेणार आहे, अशी महत्वपूर्ण घोषणा केंदीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे. केंद्रीय गृहविभागाने या घटनेची गंभीरपणे हाताळणी करण्यासाठी सज्जता केली आहे. बुधवारी पंतप्रधान मोदी पंजाबच्या दौऱयावर असताना त्यांच्या कार्सचा ताफा रस्त्यात अडविला जाण्याचा प्रकार घडला होता. नंतर त्यांनी आपला ऊर्वरित दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
आता या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या प्रवासाच्या मार्गात बदल झाले आहेत, याची स्पष्ट सूचना केंद्र सरकारने पंजाब सरकारला दिली होती. तसेच पंजाबच्या पोलिस महासंचालकांनी मार्ग मोकळा असल्याचे स्पष्ट केल्यानंतरच त्या मार्गावरुन प्रवास करण्यात आला, असे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे केंद्र सरकार पंजाब पोलिसांविरोधात कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ही त्रुटी अतिशय चिंताजनक असून या त्रुटीला पंजाब सरकार उत्तरदायी आहे. सखोल चौकशीनंतर सत्य बाहेर येईल, असा गंभीर आरोप भाजपने केला.
प्रकरण सर्वोच्च न्यायालयात
या प्रकरणी काही व्यक्तींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. या प्रकारची सखोल चौकशी करण्याचा आदेश देण्यात यावा आणि सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याचिका न्यायालयाने सादर करुन घेतली असून तिची हाताळणी 7 जानेवारीला, अर्थात आज शुक्रवारीच होणार आहे, अशी माहितीही देण्यात आली.
राष्ट्रपतींची भेट

पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यांना बुधवारी घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. राष्ट्रपती कोविंद यांनी या संपूर्ण घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली. त्यापूर्वी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली होती. कठोर पावले उचलून असे प्रकार पुन्हा होणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल, अशी आशा नायडू यांनी व्यक्त केली.
पंजाब सरकारचीही समिती
या प्रकारची चौकशी करण्यासाठी पंजाब सरकारने उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. निवृत्त न्यायाधीश मेहताब सिंग गिल आणि राज्याच्या गृहविभागाचे मुख्य सचिव अनुराग वर्मा हे या समितीचे सदस्य आहेत. येत्या तीन दिवसांमध्ये समिती अहवाल सादर करणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
आसाम काँगेसकडून सारवासारवी
पंजाबमध्ये घडलेल्या या घटनेच्या संदर्भात काँगेसकडून सारवासारवी करण्याचे काम या पक्षाच्या आसाम शाखेकडून करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कार्सच्या ताफ्याचा मार्ग आडविणाऱया आंदोलकांवर पंजाबच्या पोलिसांनी गोळय़ा चालवाव्या अशी भाजपची मागणी होती, असा आरोप या शाखेने केला. मात्र, या आरोपाचा आधार काय, या प्रश्नावर मौन पाळले आहे. पंजाब सरकारकडून सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही हयगय झाली नाही, असा दावाही करण्यात आला.
पंजाब गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
पंजाब राज्यातील भाजपचे नेते आणि पदाधिकाऱयांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची गुरुवारी भेट घेतली. राज्याचे गृहमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी केली. पंजाब सरकारने स्थापन केलेली समिती भाजप नाकारत आहे. राज्याचे मुख्यमंत्रीच या प्रकरणी प्रमुख कारस्थानकर्ते आहेत. त्यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी या नेत्यांनी केली. नुकतेच भाजपमध्ये आलेले पंजाबचे मंत्री गुरुमितसिंग सोधी यांनी या संपूर्ण घटनेसाठी पंजाब सरकारच जबाबदार आहे असा आरोप केला. या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
राज्यात राष्ट्रपती राजवट आणा
पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीला राज्य सरकार जबाबदार असून ते बरखास्त करण्यात यावे आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि पंजाब लोक काँगेस पक्षाचे नेते कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी केली आहे. मुख्यमंत्री चन्नी यांनी केलेल्या बेजबाबदार विधानांवर त्यांनी कठोर प्रहार केले. मुख्यमंत्री चन्नी यांनी प्रथेप्रमाणे भठिंडा विमानतळावर पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहणे आवश्यक होते. तथापि त्यांनी ही प्रथा मोडून पंजाबची प्रतिष्ठा धुळीस मिळविली आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
काँगेसला क्षमा नाही
पंजाबमध्ये काँगेसचे सरकार आहे. या सरकारने सूचना मिळाल्यानंतरही पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती उपाय योजना केली नाही. या चुकीला क्षमा नाही. आगामी काळात काँगेसला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना दिला आहे.