प्रतिनिधी/पणजी
जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवाने पक्षातील नेते व पदाधिकाऱयांमध्ये बरीच मोठी खलबत्ते चालू झाली आहेत. माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनी पक्षीय पातळीवर निवडणुका लढवू नये, असा सल्ला प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना दिला होता. चोडणकर यांनी या निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर अनेक आमदारांनी देखील निवडणुकीत पाठ फिरवली, अशी खंत व्यक्त केली. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी या निवडणुकीनंतर आगामी निवडणुकीत सर्वांना एकत्र घेऊनच पुढे जावे लागेल, असे स्पष्ट केले.
जिल्हा पंचायत निवडणुकीत सत्ताधारी भाजपने विरोधकांची दाणादाण उडविल्यांनतर काँग्रेसमध्ये आता पराभवावरून खमंग चर्चा सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की लोकसभा निवडणुकीत पक्षाला संमिश्र यश प्राप्त झाल्यानंतर देखील आपण प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा सादर केला होता. त्यामुळे आता या पराभवाची जबाबदारी पूर्णपणे आपण स्वीकारत आहे, तथापि पुनश्च राजीनामा देण्याची गरज नाही, तसा पक्ष संघटनेवर विपरित परिणाम होऊ शकतो, असे ते म्हणाले. मात्र आता पक्षाने दिलेल्या जबाबदारीतून मुक्त होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
आमदारांनी किमान स्वतःच्यामतदारसंघात काम करायला हवेत होते
पक्षाच्या पराभवास काही कारणे आहेत. कित्येक आमदारांनी आपल्या मतदारसंघात चांगले काम केलेले नाही. भाजपने संघटनात्मक कार्याच्या जोरावर या निवडणुका जिंकलेल्या आहेत. लुईझिन फालेरो व दिगंबर कामत यांनी तसेच विधीमंडळ गटाने देखील काँग्रसने निवडणुका पक्षीय पातळीवर लढवू नये असा सल्ला दिला होता. काँग्रेस प्रदेश समितीच्या आपण दोन वेळा बैठका घेतल्या. या दोन्ही बैठकांमध्ये निवडणुका पक्षीय पातळीवर घेण्याचा निर्णय सर्वच पदाधिकाऱयांनी घेतल्यामुळे आपलाही नाईलाज झाला. त्यामुळे या निर्णयास सर्वस्वी आपण जबाबदार नाही. आता कोणावरही आरोप करू इच्छित नाही. परंतु रवी नाईक किंवा लुईझिन फालेरो असो, आलेक्स रेजिनाल्ड असो वा प्रतापसिंह राणे असो यांनी जर पक्षासाठी काम केले असते तर कदाचित त्यांच्या मतदारसंघात देखील काँग्रसचा पराभव झाला नसता. पक्ष सर्व बाबतीत विचार करील आणि पुढील धोरण निश्चित करील असे ते पुढे म्हणाले.
आम्हाला आत्मपरीक्षण करावेच लागेल : दिगंबर कामत

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सांगितले की, काँगेसच्या पराभवास केवळ एक दोन नव्हे तर अनेक कारणे जबाबदार आहेत. आम्हाला आता आत्मपरीक्षण करावेच लागेल. पक्षाने आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. परंतु भाजपने आपल्या धोरणामुळे विरोधी पक्षांना फसविले. निवडणूक कधी होणार याची माहिती नव्हती. हीच निवडणूक मार्चमध्ये झाली असती तर चित्र पूर्णत: भाजपच्या विरोधात गेले असते. कोरोनामुळे काँग्रसचे कार्यकर्ते जनतेच्या घरोघरी पोचू शकले नाहीत. परंतु ही सर्व कारणे आता बाजूला ठेवून यानंतर सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणल्याशिवाय पाऊल उचलता येणार नाही. आमची बरीचशी शक्ती आंदोलतात खर्ची झाली. भाजपने संघटना पातळीवर भरपूर काम केल्यामुळे त्यांना त्याचा फायदा झाला. आपण यापूर्वीच पक्षाचे निरीक्षक दिनेश गुंडूराव यांच्याशी चर्चा केली आहे. यानंतर पालिका निवडणुकीत काँग्रेस इतर विरोधी पक्षांना एकत्र घेऊन भाजपच्या विरोधात जोरदार लढा देईल आणि यश खेचून आणील, असे ते म्हणाले.
माझा सल्ला मान्य केला असता… : लुईझिन फालेरो
माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते लुईझिन फालेरो यांनी सांगितले की, आपण प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना जि. पं. निवडणूक ही फेब्रुवारीमध्ये घोषित झाली होती त्याचवेळी निवडणूक पक्षीय पातळीवर लढवली जाऊ नये, असे कळविले होते. आजपर्यंत आपण नेहमीच पक्षीय संघटनेवर जास्त भर देत आलेलो आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून नवे नेतृत्व उदयास यावे. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या पातळीवर व्हाव्यात, असे आपण सुचविले होते. परंतु नंतर काय झाले माहित नाही. या निवडणुकीत काँग्रसने पक्षीय पातळीवर प्रवेश केला आणि तिथे पक्ष फसला. आता या नंतर आगामी विधानसभा निवडणुकीला 12 महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे आम्हाला बुथ पातळीवर पक्ष संघटना मजबूत करण्यावरच जास्त भर द्यावा लागेल. पक्षाला कोणीतरी हायजॅक करतो की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे. आपण पक्ष तळागाळातून वर यावा यासाठी खूप प्रयत्न केले होते. आता देखील प्रयत्न झाले पाहिजेत यावर आपण आणखी काहीच बोलू शकत नाही, असे फालेरो म्हणाले.