भारतीय चित्रसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल देण्यात येणारा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेत्या आशा पारेख यांना जाहीर झाल्याने खऱया अर्थाने एका प्रतिभावान आणि गुणी अभिनेत्रीचा सन्मान होत आहे. मागच्या तब्बल 22 वर्षांनंतर आशाताईंच्या रुपाने एका महिलेला हा पुरस्कार मिळणे आणि तोही देशभर स्त्री शक्तीचा जागर होत असताना हा नक्कीच विलक्षण योगायोग मानायला हवा. यापूर्वी गानक्षेत्रातील कामगिरीबद्दल ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता आपल्या चतुरस्र अभिनयाने रसिकमनावर भुरळ घालणारी ज्युबली गर्ल भारतातील या सर्वोच्च पुरस्काराची मानकरी ठरते, हे निश्चितच आनंददायी होय. जवळपास दीड ते दोन दशके त्यांनी बॉलिवूडवर गडद प्रभाव टाकला, तो आपल्या चतुरस्र अभिनयाच्या बळावर. 1959 ते 1973 हा कालखंड खऱया अर्थाने त्यांच्याकरिता बहारीचा काळ म्हणता येईल. यादरम्यान, हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या आणि सर्वाधिक मानधन घेणाऱया अभिनेत्या अशीच त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांचा परिसस्पर्श चित्रपटाला लागावा, अशीच बहुतेक दिग्दर्शकांची अपेक्षा असे. तरीही आशाताईंनी केवळ चित्रपटांची खोगीरभरती केली नाही. चांगले कथानक, उत्तम गाणी असलेले चित्रपट निवडणे आणि त्यात आपल्या अभिनय व अदाकारीचा प्राण ओतणे, यावरच त्यांचा प्रामुख्याने कटाक्ष असे. त्यामुळे त्या सर्वाधिक यशस्वी अभिनेत्री होऊ शकल्या. 2 ऑक्टोबर 1942 रोजी जन्मलेल्या आशाताईंना बालपणापासून नृत्याची आवड होती. या नृत्यकलेतूनच त्यांना चित्रपटाचे द्वार खुले झाले, असे म्हणता येईल. कोवळय़ा वयात एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या या डान्सिंग गर्लचे नृत्य दिग्दर्शक बिमल रॉय यांनी पाहिले आणि 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मां’ चित्रपटामध्ये काम करण्याची संधी त्यांना आपसूक चालून आली. तेथून सुरू झालेला त्यांचा अभिनयप्रवास एखाद्या मधुमालतीच्या वेलीसारखा पसरत, बहरत गेला. अभिनयातील वेगवेगळे शेड्स हे त्यांचे प्रमुख वैशिष्टय़ मानायला हवे. आरस्पानी सौंदर्य, त्याला मिळालेली नृत्याची जोड हे त्यांचे बलस्थान होतेच. किंबहुना, अभिनयातील जिवंतपणा हा आशाताईंचा विशेष मानावा लागेल. भूमिका गंभीर धाटणीची असो वा अवखळ. ती विलक्षण ताकदीने साकारण्याकरिता त्या कधीही कोणतीही तडजोड करीत नसत. कारवाँ या चित्रपटात जितेंद्रसोबतचा त्यांचा जेवण चोरतानाच सीन कोण विसरेल? साधी सरळ सुनीताही या प्रसंगात हास्याची लकेर उमटविते, ही त्यांच्या अभिनयाचीच कमाल होय. बॉलिवूडमध्ये 95 हून अधिक चित्रपट करणाऱया आशा पारेख यांनी विश्वजित, जॉय मुखजी, राजेश खन्ना, सुनील दत्त, मनोज कुमार, धर्मेंद्र, जितेंद्र, शम्मी कपूर, शशी कपूर अशा वेगवेगळय़ा अभिनेत्यांसोबत काम केले. अगदी जुन्या जमान्यापासून ते आत्तापर्यंतच्या एकूणच चित्रपटांचा आपण धांडोळा घेतला, तर बहुतांश सिनेमांमध्ये नायकच प्रमुख भूमिकेत पहायला मिळतो. आशाताई अभिनित अनेक चित्रपटही वरकरणी नायकप्रधान असले, तरी ते तसे कधीच वाटले नाहीत. उलटपक्षी अनेक चित्रपटांमध्ये आशा पारेख आपल्या या सहकलाकारापेक्षा सरस वाटतात. याला कारण त्यांच्या अभिनयाची जादू होय. एरवी अभिनेत्रीने नाचगाणे करावे, झाडाभोवती गिरक्या घ्याव्यात, लाजावे, मुरडावे, अशाच काहीशा चौकटी होत्या. निसर्गदत्त सौंदर्य आणि नृत्यनिपुणतेवर आशाताईंनी चित्रटातील गाणी वेगळय़ा उंचीवरच नेली. पण, हीच ग्लॅमर गर्ल ‘कटी पंतग’सारख्या चित्रपटात वैधव्याचे प्रतीक मानल्या जाणाऱया फिक्या पांढऱया रंगातही अभिनयाच्या जोरावर उठून दिसली. हा केवळ आणि केवळ त्यांच्या अभिनयाचा चमत्कार होय. प्यार दिवाना होता है, ये श्याम मस्तानी, ये जो मोहब्बत है, जिस गली मे तेरा घर, अशी एकापेक्षा एक सरस गाणी लाभलेल्या या चित्रपटात राजेश खन्नासारखा सुपरस्टार असला, तरी अनेक प्रसंगांत, गाण्यांमध्ये ‘मधू’ भरून राहते. मेरी जिंदगी है क्या, एक कटी पतंग है…हे तिचे बोल, त्यातील वेदना अन् चेहऱयावरचे शोकमग्न भावही रेंगाळत राहतात. याच चित्रपटासाठी त्यांना फिल्म फेअर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ‘तिसरी मंजिल’मधील शम्मीसोबतचे ओ मेरे सोना रे सोना रे सोना रे, दे दुँगी जान जुदा मत होना रे, आजा आजा मै हू प्यार तेरा, धर्मेंद्रसोबतचे पर्दे मे रहने दो, ही गाणीही नायिका म्हणून त्या ताकदीने पेलून नेतात. ‘लव्ह इन टोकियो’मधील सायोनारा सायोनारा या गीतामधील जपानी गुडिया अशीच लोभस. कन्यादानमधील शशी कपूरसोबतच्या ‘लिखे जो खत तुझे’मधील सोज्वळ भाव, तर बंगले के पिछे, या गाण्यातील उत्फुल्लपणा….अशा कितीतरी छटांनी त्यांची गाणी रसरसलेली असत. त्यांच्या गाण्यांची यादी अजूनही लांबविता येईल. या सगळय़ा पलीकडे जाऊन वाटय़ाला आलेल्या सर्वच भूमिकांना त्यांनी योग्य न्याय दिला. तरीदेखील मोठी कुवत असूनही एखाद दुसरा अपवाद सोडून नायिकाप्रधान भूमिका न मिळणे, हा त्यांच्यावरचा अन्यायच म्हणता येईल. अर्थात तरीही दमदार अभिनयाचा कारवाँ त्या वेळोवेळी दाखवून देतात, यातच त्यांचे श्रेष्ठत्व होय. पद्मश्री किताबाने सन्मानित या अभिनेत्रीने सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष म्हणूनही ठसा उमटविला. आज जीवनाच्या सायंकाळीदेखील ही अभिनेत्री आनंदात जगते आहे. कुठल्या दुसऱया सिक्वेलपेक्षा ‘जिंदगी मिले ना दोबारा’मध्ये काम करायला आवडेल, असेही ती म्हणते. त्यातूनच तिच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते. पर्दे मै रहने दो, असे म्हणणारी ही नायिका प्रत्यक्षात पडद्यापलीकडची आहे, हेच तिच्या कारकिर्दीवरून लक्षात यावे.
Previous Article40 हजार चिनी नागरिकांना देशाबाहेर काढणार
Next Article धर्मांतर बंदी विधेयकाला राज्यपालांची मंजुरी
Related Posts
Add A Comment