डॉ. राजेंद्र कशेळकर यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
दर दोन वर्षांनी ऑर्थोटिक्स प्रोस्थेटिक्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे 26व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले जाते. यंदा ओपाय ही परिषद पणजीत दि. 28 रोजी ते 30 रोजीपर्यंत पणजी कन्वहेंशन सेंटर पणजी येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती ऑर्थोटिस्ट ऍण्ड प्रोस्थेटिस्ट आयोजक सरचिटणीस डॉ. राजेंद्र कशेळकर यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
ऑर्थोटिक्स प्रोस्थेटिक्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. माधवराज, सरचिटणीस ए. पत्रा, उपाध्यक्ष जी. पंडियान, राजेंद्र कुमार उपस्थित होते.
या परिषदेचे उद्घाटन माजी कायदा मंत्री ऍड. रमाकांत खलप यांच्याहस्ते होणार आहे. या परिषदेसाठी 500हून जास्त तज्ञ, विद्यार्थी, प्राध्यापक संबंधित क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर देश विदेशातून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती कशेळकर यांनी यावेळी दिली. ऑर्थोटिक्स व प्रोस्थेटिक्स असोसिएशन ऑफ इंडिया ही रिहॅबलिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त असून दर दोन वर्षांनी देशभरात विविध ठिकाणी परिषदेचे आयोजन करते. यात विविध प्रकारच्या संशोधनावर चर्चा केली जाते. तसेच यासाठी लागणारी अद्ययावत उपकरणे, तंत्रज्ञान तसेच या विषयातील तज्ञांच्या विचारांचे अनुभवांचे आदान प्रदानही करण्यात येते. नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापराने दिव्यांगांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाया रचण्याचे कार्य हे या संस्थेचे उद्दीष्ट आहे.
प्रोस्थेटिक्स ऑर्थोटिक्स संबंधित विविध प्रकारच्या उपकरणांचे, साधनांचे प्रदर्शनदेखील भरविण्यात येणार आहे. गोव्यातील सर्व संबंधित शासकीय तसेच सेवाभावी संस्था, पदाधिकारी यांनी दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठीच्या अत्याधुनिक उपकरणे, साधने यांच्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा व त्यानिमित्ताने दिव्यांगांचे राहणीमान उंचावण्यासाठी नवनवीन असणारी उपकरणे अवगत व्हावीत हा प्रमुख उद्देश आहे असे कशेळकर यांनी यावेळी सांगितले.