वीस ग्रामपंचायतींच्या 18 प्रभागांत तर जिल्हा पंचायतीच्या नावेलीत पोटनिवडणूक : सांखळी पालिकेच्या प्रभाग 9 मध्ये पोटनिवडणूक
प्रतिनिधी / पणजी
पणजी महानगरपालिका आणि राज्यातील सहा पालिका तसेच 20 ग्रामपंचायती, सांखळी पालिकेचा प्रभाग 9 व नावेली जिल्हा पंचायत यांच्या दि. 20 रोजी होणाऱया निवडणूक व पोटनिवडणुकांची प्रचाराची रणधुमाळी आज गुरुवारी सायंकाळी 5 वाजता संपुष्टात येणार आहे. शनिवारी मतदान होणार आहे.
पणजी मनपाच्या 30 प्रभागांमधून तब्बल 95 उमेदवार नशीब आजमावणार आहेत तर सहा पालिकांपैकी डिचोलीतून 68, वाळईतून 23 (पैकी 1 बिनविरोध), पेडणेमधून 37, कुंकळ्ळीतून 66, कुडचडेतून 48 आणि काणकोणमधून 31 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
सांखळी पालिकेच्या प्रभाग 9 साठी होणाऱया पोटनिवडणुकीत दशरथ आजगावकर आणि राजेंद्र आमशेकर या दोन उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे.
राज्यातील 20 पंचायतींच्या 22 प्रभागांसाठी पोटनिवडणूक होणार होती. मात्र त्यातील म्हाऊस, भिरोंडा, रिवण आणि चिखली या पंचायतींचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यामुळे आता केवळ 18 प्रभागात निवडणूक होणार आहे.
नावेली जिल्हा पंचायत मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी चौघांमध्ये तर 20 ग्रामपंचायतींच्या 22 प्रभागांमधून होणाऱया पोटनिवडणुकीसाठी 49 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.
सर्वांचा घरोघरी प्रचारावरच भर
या सर्व उमेदवारांनी गेल्या काही दिवसांपासून विश्रांती न घेता प्रचारकार्यात झोकून दिले होते. कोपरा बैठका आणि घरोघरी भेटी देण्यावरच बहुतेक उमेदवारांनी भर दिला होता. आपले जाहीरनामे प्रसिद्ध करून विविध आश्वासने देताना मतदारांना आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न करण्यात आले. या सर्व प्रक्रियेत यातील अनेक उमेदवारांना त्या त्या भागातील आमदार, मंत्री यांचा पूर्ण पाठिंबा मिळाला. काहीजणांनी मात्र स्वतःच्या कार्यकर्त्यांसह स्वतंत्ररित्या प्रचार केला. ही प्रचार रणधुमाळी आज दि. 18 रोजी सायंकाळी 5 वाजता संपुष्टात येणार आहे. त्यानंतर एका दिवसाची उसंत मिळणार असून दि. 20 रोजी मतदान होणार आहे.
निकाल जाहीर करण्याबाबत अनिश्चितता
दरम्यान, या सर्व निवडणुकांची मतमोजणी दि. 22 रोजी करण्याचे निश्चित करण्यात आले असले तरी आरक्षणाच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविलेल्या मडगाव, मुरगाव, सांगे, केपे व म्हापसा या पालिकांच्या निवडणुकीची तारीख अद्याप निश्चित झाली नसल्यामुळे वरील निवडणुकांचा निकालही मतपेटीतच बंदिस्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पालिका निवडणुका भाजपच जिंकणार

पालिका निवडणुका भाजपच जिंकणार असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला असून अनेक पालिका निवडणुकीत भाजपचेच दोन दोन उमेदवार उभे करण्यात आल्याची कबुली त्यांनी दिली आहे. मिरामार येथे स्व. मनोहर पर्रीकर यांच्या समाधीस्थळाकडे त्यांना पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पेडणे, काणकोण, डिचोली, कुडचडे अशा विविध पालिका निवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी होणार आहेत. अनेक ठिकाणी भाजपचे दोन उमेदवार असून कोणीही आला तरी तो भाजपचाच असेल, असे निवेदन डॉ. सावंत यांनी केले.
उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, जलस्रोतमंत्री फिलीप नेरी रॉड्रीग्ज, महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात तसेच भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे आणि इतरांनी स्व. मनोहर पर्रीकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. पर्रीकर यांच्या कुटुंबातील सदस्य त्यावेळी उपस्थित होते.
कोरोना महामारीमुळे समाधीस्थळाचे बांधकाम मंदावले होते, परंतु आता ते नेटाने पुन्हा सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले असून येत्या 6 महिन्यात ते काम पूर्ण होईल, असे डॉ. सावंत यांनी नमूद केले.