अनगोळ येथील घटना, पतीला अटक
प्रतिनिधी / बेळगाव
पतीच्या जाचला कंटाळून कोनवाळ-आंबेडकरनगर, अनगोळ येथील एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. यासंबंधी टिळकवाडी पोलीस स्थानकात पतीविरुध्द फिर्याद दाखल करण्यात आली आहे. गुरुवारी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
दीपाली योगेश जगदाळे (वय 34, रा. कोनवाळ-आंबेडकरनगर, अनगोळ) असे त्या दुर्दैवी विवाहितेचे नाव असून दीपालीचे वडील मोहन सिध्दाप्पा सोमनाचे (रा. मारुती गल्ली, अनगोळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पती योगेश मुरलीधर जगदाळे (वय 36, मुळचा रा. पुणे, सध्या रा. अनगोळ) याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
भा.दं.वि. 306, 498(ए) कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर, उपनिरीक्षक मनिकंठ पुजारी आदी अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. बुधवारी रात्री उशीरा एफआयआर दाखल करुन पोलिसांनी तपास हाती घेतला आहे.
गेल्या सहा वर्षांपूर्वी पुणे येथील योगेश जगदाळे याच्याशी दीपालीचे लग्न झाले होते. सध्या हे दांपत्य अनगोळ येथे वास्तव्यास होते. लग्नानंतर दीपालीचे मानसिक व शारीरिक छळ करण्यात येत होते. अर्वाच्य शिवीगाळ करीत तीला मारहाणही करण्यात येत होती. त्यामुळे तीने गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी दीपालीने मृत्यूपत्र लिहून ठेवले आहे. पतीच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे तीने चिठ्ठीत उल्लेख केला आहे. त्यामुळे आत्महत्येच प्रकृत केल्याच्या आरोपावरुन दीपालीचा पती योगेश जगदाळे विरुध्द एफआयआर दाखल करण्यात आला आहे. टिळकवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान पोलिसांनी पतीला अटक केली आहे.