प्रतिनिधी /बेळगाव
चिरागनगर येथील चिराग खड्डा परिसरात पन्नी विकणाऱया जोडगोळीला शुक्रवारी खडेबाजार पोलिसांनी अटक केली. त्यांचे आणखी तीन साथीदार फरारी झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या दोघा जणांकडून 16 ग्रॅम 387 मिली इतक्या पन्नीच्या 67 चिठ्ठय़ा जप्त करण्यात आल्या आहेत.
अरझान घोरी (वय 22, रा. दरबार गल्ली), युनुस मकानदार (वय 20, रा. खंजर गल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. त्यांचे साथीदार सलमान शहा, यासीन शहापुरी, वासिम उर्फ भट गवंडी हे तिघे जण फरारी झाले आहेत.
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी ही माहिती दिली. शुक्रवारी दुपारी खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, उपनिरीक्षक आर. बी. सौदागर, शंकर शिंदे, बसवराज उज्जनकोप्प व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली. चिराग खड्डा परिसरात यापूर्वीही पन्नी, गांजा जप्त करण्यात आले होते.
बेळगावला मुंबईहून पन्नी पुरवठा केला जात असल्याचे यापूर्वीच पोलीस तपासात उघडकीस आले आहे. खडेबाजार पोलिसांनी मुंबई येथील महिलेला अटकही केली होती. चिराग खड्डा परिसरात अमलीपदार्थांची विक्री व सेवन मोठय़ा प्रमाणात केले जाते. वारंवार कारवाई करूनही अमलीपदार्थ विकणारे तरुण याच परिसरात आपला अड्डा थाटतात. यासंबंधी पाच जणांविरुद्ध येथील खडेबाजार पोलिसात अमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा 21 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यासीन, वासिम व सलमान हे तिघे विक्रीसाठी पन्नी पोहोचवत होते. मात्र, त्यांना पन्नी कोठून मिळते याचे धागेदोरे शोधण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे.