नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
पोलीस आयुक्त पदावरुन हटवून गृह रक्षक दलामध्ये बदली केल्याच्या विरोधात परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचाराची निःपक्षपाती आणि योग्य सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
याचिकेत परमबीर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबानी प्रकरणात तपास योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा याची आपण खात्री केली होती. याशिवाय एनआयएकडून होणाऱ्या तपासात कोणताही अडथळा आणला नव्हता. आकसापोटी आपली बदली करण्यात आली आहे . केवळ अंदाज आणि पूर्णपणे शक्यतांच्या आधारे निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासोबत बदली आणि पोस्टिंगसाठी करण्यात येणाऱ्या गैरव्यवहारासंबंधी रश्मी शुक्ला यांनी सादर केलेल्या अहवालासंबंधीही सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासोबतच आपले आरोप सिद्ध करण्यासाठी अनिल देशमुख यांच्या मुंबईमधील निवासस्थानावरील सीसीटीव्ही ताब्यात घेतले जावेत अशी विनंती देखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे.