प्रतिनिधी / मडगाव :
दक्षिण गोव्यातील महत्त्वाचा मडगावातील घाऊक मासळी बाजार खुला करण्यासंदर्भात मते जाणून घेण्यासाठी दक्षिण गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाने बोटमालक, रांपणकार व अन्य मच्छीमार संघटनांच्या प्रतिनिधींची मंगळवारी बैठक घेतली असता परराज्यांतून मासळी घेऊन येणाऱयांस कोविड नकारात्मक प्रमाणपत्र सक्तीचे करावे, अशी मागणी त्यात गोमंतकीय मच्छीमार संघटनांनी उचलून धरली.
प्राधिकरणाचे अध्यक्ष असलेले नुवेचे आमदार विल्प्रेड डिसा यांनी पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली. रांपणकार व बोटमालक मिळून सुमारे 28 संघटना असून त्यातील बहुतेकांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले असल्याचे त्यांनी सांगितले. 1 ऑगस्ट रोजी घाऊक मासळी मार्केट खुले करण्याचे प्राधिकरणाने ठरविले होते. पण त्यास विरोध करून परराज्यांतून मासळी आणणाऱया व्यवसायिकांनी उच्च न्यायालयात दाद मागितल्यावर 10 जुलै रोजी मार्केट खुले करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार ते खुले करण्यात आले. मात्र चार-पाच दिवसांत येथे सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजत असल्याचे आढळून आल्याने मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. तेथील विक्रेत्यांनी जिल्हाधिकाऱयांना नुकतेच सोशल डिस्टन्सिंग व अन्य अटी पाळण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. आज बुधवारी जिल्हाधिकाऱयांसमवेत बैठक होणार असून त्यास उपस्थित राहून आपले मत मांडावे असे आपण गोमंतकीय मच्छीमारांना सूचित केले आहे, असे डिसा यांनी स्पष्ट केले.
बाजारात संसर्ग पसरण्याची भीती
परराज्यांतून मासळी आणणाऱयांना कोविड नकारात्मक प्रमाणपत्र सक्तीचे करण्याची मागणी आम्ही उचलून धरली, असे रांपणकारांचे प्रतिनिधी ओलेन्सियो सिमॉन्स यांनी सांगितले. परप्रांतांतून येणाऱयांच्या 20, तर गोमंतकीयांच्या 15 मासळीवाहू वाहनांना घाऊक मार्केटमध्ये प्रवेश देण्यास आम्ही आक्षेप घेतला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आम्ही 1 ऑगस्ट नव्हे, तर 1 सप्टेंबरपासून मासेमारी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. परराज्यांतून येणाऱया मासळीशी संबंधित असलेल्यांकडून आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न झाल्यास बाजारपेठेत कोविड संसर्ग पसरण्याची भीती त्यांनी बोलून दाखविली. सदर मासळी बाजार मासळी व्यवसायिकांचा की गोमंतकीय मच्छीमारांचा असा सवाल स्थानिक मच्छीमारांच्या कमी वाहनांना प्रवेश देण्याच्या विषयावरून उपस्थित करण्यात आल्याचे सिमॉन्स यांनी सांगितले.