भोगावती / प्रतिनिधी
परिते ता. करवीर हद्दीतील भोगावती ते कोल्हापूर मार्गावर बुधवारी रात्री एका पिग्मी एजंटला आढळलेला पट्टेरी वाघ नसून परिसरातील पायांच्या ठशावरुन तो बिबट्या असल्याचा निष्कर्ष वन खात्याने गुरुवारी काढला आहे. दरम्यान यामुळे संपूर्ण भोगावती परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.तर परिते ग्रामपंचायतीने दवंडी देऊन दक्षता घेण्याचा इशारा ग्रामस्थांना व भोगावती बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना दिला आहे.
भोगावती येथील गजानन सहकारी पतसंस्थेचे पिग्मी एजंट शिवाजी कुंडलिक टिपूगडे रा राशिवडे हे कुरुकली ता करवीर गावातील पिग्मी गोळा करून परत गावाकडे येत होते.त्यावेळी परिते गावाजवळील दौलत हाँटेलकडे भोगावती नदीकडून अचानक वाघ सदृश्य प्राण्याने झेप घेऊन वेगाने रस्ता पार केला व त्याने डोंगराकडे धाव घेतल्याचे श्री टिपूगडे यांनी पाहिले असल्याचे घाबरलेल्या अवस्थेत परिते ग्रामस्थांना सांगितले.त्यानंतर ग्रामपंचायतीने परिते गावात त्वरित दवंडी देऊन सतर्कतेचा इशारा दिला होता.
गुरुवारी सकाळपासून भोगावती परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते.वनपाल विजय पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करण्यासाठी रेस्क्यु पथक पाठवले होते.त्यांनी तपासानंतर हा पट्टेरी वाघ नसून तरस असल्याचा अंदाज व्यक्त केला.मात्र श्री टिपूगडे यांनी तो फेटाळून लावला.त्यानंतर रेस्क्यू पथकाने घटनास्थळावरून डोंगराकडे तपास करून माग काढला.त्यावेळी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका शेतातील ऊसलागण केलेल्या वाफ्यात ठसे आढळले.तर पुढील तपासात एका शेततळ्या च्या काठावर काही ठसे आढळून आले आहेत.यावरून तो प्राणी पट्टेरी वाघ नसून बिबट्या असल्याचा निष्कर्ष वनखात्याने काढला आहे.
या परिसरात दोन लांडोरींची शिकार या प्राण्याने केली असल्याचे आढळले आहे.डॉ संतोष वाळवेकर यांच्या या पथकात अवधूत कुलकर्णी, ऋषिकेश सुतार व अनिल ढोले यांचा समावेश होता.दरम्यान गुरुवारी सायंकाळी परिते ग्रामपंचायतीने पुन्हा भोगावती बाजारपेठेत दवंडी देऊन सर्व व्यापाऱ्यांनी दक्षता घ्यावी व सायंकाळपुर्वी दुकाने बंद करून आपआपल्या गावी परत जाण्याची सुचना दिली आहे.
सदरचा बिबट्या हा भोगावती नदीच्या पश्चिमेला असलेल्या राशिवडे बुद्रुक किंवा हसूर दुमाला गावातील शेतातून आला असण्याची शक्यता आहे.मात्र नदीचे पात्र कसे ओलांडले हा प्रश्नच आहे.तरीही कोल्हापूर राधानगरी रस्ता पार करून तो डोंगराच्या बाजूला गेला आहे.त्यामुळे परिते व कुरुकली गावासह बेले,म्हाळुंगे परिसरातील शेतीत गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे भोगावती परिसरातील या गावात ऊस तोडणी करणारे मजूर,शेतात वैरणीसाठी व कामासाठी जाणारे शेतकरी व ग्रामस्थांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.