राज्य सरकारला पोटनिवडणुकीची चिंता : कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांचा आरोप
प्रतिनिधी / बेंगळूर
सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे वेतनवाढ आणि सरकारी कर्मचारी म्हणून दर्जा देण्याची मागणी करून राज्य परिवहन कर्मचाऱयांनी बुधवारपासून पुकारलेला संप सोमवारही सुरूच राहणार आहे. राज्य सरकारला पोटनिवडणुकीची चिंता लागली आहे. याव्यतिरिक्त कर्मचाऱयांच्या समस्या दिसत नाहीत, असा आरोप परिवहन कर्मचारी संघाचे गौरवाध्यक्ष कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी केला आहे. तसेच सोमवारीपासून जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांसमोर ताट वाजवून संप करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले.
सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. 16 मार्च रोजी सरकारकला नोटीस पाठविली होती. तसेच खूप वेळही दिला होता. तरीही मुख्यमंत्री किवा परिवहन मंत्र्यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलविले नाहीत. परिवहन संस्थेच्या कर्मचाऱयांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी सरकारने ईच्छाशक्ती दाखवावी. सहाव्या वेतन आयोगाची शिफारस करण्यास सरकारने संमती दर्शविली होती. पण सरकारी कर्मचारी म्हणून दर्जा देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. असे असताना आंध्रप्रदेश सरकारने याला कशी संमती दिली? असा प्रश्न उपस्थित करत ईच्छाशक्ती असल्यास सर्वकाही शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
आयोग शिफारसीप्रमाणे वेतन देणे शक्य नाही : सवदी

सध्याच्या परिस्थितीत सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे वेतन देणे शक्य नाही, असे उपमुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी स्पष्ट केले. हुमनाबाद येथे पत्रकारांशी ते बोलत होते. कर्मचाऱयांनी संप मागे घेऊन कामावर हजर राहिल्यास पुढील दिवसात चर्चा करून समस्या दूर करण्यास शक्य होईल. प्रशिक्षण घेत असलेल्या कर्मचाऱयांना संप करण्याचा अधिकार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.