महागाई भत्त्यासह वैद्यकीय सेवा पुरवा
प्रतिनिधी /बेळगाव
शासनाने मागील काही वर्षांपासून परिवहनच्या निवृत्त कर्मचाऱयांकडे दुर्लक्ष केले आहे. निवृत्त कर्मचाऱयांना केवळ तुटपुंजी पेन्शन दिली जाते. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱयांचे दैनंदिन जीवन खडतर बनले आहे. परिवहनच्या निवृत्त कर्मचाऱयांना वाढीव पेन्शन देण्याबरोबरच महागाई भत्ता द्यावा, अशी मागणी परिवहनचे निवृत्त कर्मचारी व ईपीएस पेन्शन वेल्फेअर फेडरेशनने शुक्रवारी सुवर्णविधानसौध परिसरात आंदोलनाद्वारे केली.
परिवहनचे निवृत्त चालक, वाहक आणि तांत्रिक कर्मचाऱयांना केवळ 1 हजार रुपये पेन्शन दिली जाते. पेन्शन वाढीसाठी सुप्रिम कोर्टाने परवानगी दिली आहे. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे कर्मचाऱयांना वाढीव पेन्शनबरोबर वैद्यकीय सेवा पुरवाव्यात, अशी मागणीही करण्यात आली.
निवृत्त कर्मचाऱयांना न्यायालयाच्या सूचनेनुसार तातडीने वाढीव पेन्शन व महागाई भत्ता द्यावा, अशी मागणी परिवहनच्या निवृत्त कर्मचाऱयांनी केली आहे.