30 वर्षांमध्ये कधीच लावली नाही कात्री
स्वतःचे केस सुंदर, लांब आणि रेशमासारखे असावेत अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. परंतु 6.5 फूट लांब केसांची कल्पना फारच कमी जणी करू शकतात. युक्रेनमधील एलोना पेवशेंकोने हे स्वप्न साकार करून दाखविले आहे. तिचे केस पाहणाऱयाला ती एखाद्या परीकथेतून बाहेर आल्याचे वाटते. एलोनाच्या केसांची लांबी माणसांच्या केसांच्या सरासरी लांबीपेक्षा अधिक आहे.

एलोना पेवशेंकोच्या केसांची लांबी 6.5 फूट आहे. म्हणजेच एखाद्या माणसाच्या उंचीपेक्षाही अधिक आहे. तिचे केस अत्यंत लांब असल्याने केवळ केसच तिचे पूर्ण शरीर झाकोळू शकतात. एलोनाचे केस अत्यंत संदर आणि सोनेरी आहेत. तिचे केस पाहून ती डिस्नेची राजकन्या असल्याचा भास होऊ शकतो. 35 वर्षीय एलोनाची छायाचित्रे इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात.
उद्योजिका असलेली एलोना युक्रेनच्या ओडेसा येथे राहते आणि इन्स्टाग्रामवर स्वतःच्या जीवनाशी निगडित छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर करत असते. केसांना महिलांच्या सौंदर्याशी जोडणाऱया एलोनाला केसांबद्दल प्रचंड प्रेम आहे.

महिलांनी स्वतःचे केस कापू नयेत आणि ते लांब ठेवण्याचा प्रयत्न करावा असे तिच्या आईने सांगितले होते. स्वतःच्या आईची सूचना पाळून तिने केस न कापण्याचा निर्धार वयाच्या 5 व्या वर्षीच केला होता. ती स्वतःच्या केसांची चांगली निगा ठेवते आणि त्यांना तुटण्यापासून वाचविते. मागील 30 वर्षांपासून तिने स्वतःच्या केसांना कात्री लावू दिलेली नाही.