जेष्ठ नेते शरद पवार व प्रसिद्ध रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात झालेली खलबते, त्या अनुषंगाने दिल्लीत राजकीय घडामोडींना आलेला वेग व पवारांच्या पुढाकारातून भाजपाविरोधात नव्या आघाडीच्या दिशेने पडू लागलेली पावले यामुळे देशातील राजकारण सध्या ढवळून निघाले आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय मिळविणाऱया भाजपाने 2019 मध्ये त्यापेक्षाही निर्भेळ यश मिळवत सत्तेवरील आपली मांड अधिक पक्की केली, तर दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष म्हणून ओळखला जाणारा काँग्रेस पक्ष अधिक गलितगात्र झाल्याचे दिसून आले. किंबहुना, पश्चिम बंगालमधील निकालानंतर भाजपालाही पराभूत करता येऊ शकते, असा विश्वास विरोधकांमध्ये निर्माण झाला असावा. काँग्रेसची पीछेहाट होत असताना अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांची कामगिरी चांगली राहिली आहे. या पार्श्वभूमीवर अशा पक्षांची मोट बांधून भाजपाला आव्हान देता येईल काय, याची चाचपणी सध्या सुरू असल्याचे दिसत आहे. मुख्य म्हणजे या साऱयाच्या केंद्रस्थानी आहेत, ते महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार. पवार यांचा राजकारणातील अनुभव मोठा आहे. राज्यात सर्वप्रथम पुलोदचा प्रयोग कुणी घडवून आणला असेल, तर तो पवार यांनीच. तेच पवार आता वेगवेगळय़ा पक्षांना घेऊन देश स्तरावर नवा प्रयोग करण्याच्या दिशेने पावले टाकताना दिसतात. त्या दृष्टीने पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी प्रादेशिक पक्षांचे नेते व विविध क्षेत्रातील मान्यवरांची झालेली बैठक ही राजकीयदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाची मानायला हवी. ज्ये÷ नेते यशवंत सिन्हा यांच s’राष्ट्रमंच’ नावाचे व्यासपीठ आहे. त्या बॅनरखाली व पवारांच्या निवासस्थानी ही बैठक होणे, या गोष्टी बरेच काही सांगून जातात. या बैठकीत नेमके काय झाले, हे पुरेसे स्पष्ट झाले नसले, तरी नव्या तुतारीसाठी ही बैठक निमित्त ठरेल काय, हे पहावे लागेल. या बैठकीचे आणखी महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे काँग्रेसला त्यातून वगळण्याची घेतलेली भूमिका. एकेकाळी देशावर राज्य करणाऱया या पक्षाच्या खासदारांची संख्या आता चाळीसपर्यंत खाली आहे. तरीदेखील आसेतु हिमाचल राष्ट्रीय म्हणून गणला जाणारा हाच काय तो पक्ष. तशा अनेक पक्षांनी अलीकडे काँग्रेसशी आघाडय़ा करून पाहिल्या. जागांसाठी अडून रहायचे, पण प्रचारात जोर लावायचा नाही नि सरतेशेवटी हाराकिरी करायची, हेच काँग्रेसचे पक्षीय धोरण असल्याचा अनुभव आल्याने त्यापेक्षा त्यांच्याशी आघाडी न केलेली बरी, या निर्णयाप्रत प्रादेशिक पक्ष आलेले पहायला मिळतात. त्यामुळे काँग्रेसला सध्या दूर ठेवण्यामागे त्यांना या सगळय़ाच्या केंद्रस्थानी न ठेवण्याचा उद्देश असू शकतो. एक तिसरी वा चौथी आघाडी भाजपाला आव्हान देऊ शकत नाही, असे स्वतः प्रशांत किशोर म्हणतात. ममता बॅनर्जी यांच्या विजयात पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावणाऱया प्रशांत किशोर यांचे राजकीय आकलन जबरदस्त आहे. म्हणूनच त्यांचे हे मत अधिक वास्तववादी म्हणता येते. तिसऱया आघाडीचे प्रयोग याआधीही देशाने पाहिले आहेत. त्याचे काय झाले, हा इतिहास जुना नाही.स्वाभाविकच काँग्रेसला बाजूला ठेवून किंवा दुय्यम, तिय्यम स्थान देऊन ही आघाडी कितपत यशस्वी होईल, हा प्रश्नही असेलच. अर्थात काँग्रेसनेही आपला ढिम्मपणा असाच ठेवला, तर पक्षाची स्थिती आणि गणना अशा दोन्ही पातळय़ांवर प्रादेशिक पक्ष म्हणूनच त्यांचे स्थान अधिक ठळक असेल. तिकडे नेतृत्वाचा प्रश्न अद्यापही काँग्रेसला सोडविता आलेला नाही आणि ऍक्शन मोडमध्ये येण्यासाठीही हा पक्ष अशा काही राजकीय घडामोडींची वाट पाहतो, यातच सारे आले. हे पक्षीय मरगळलेपण केवळ स्वबळाची भाषा केल्याने जाईल काय याचाही या पक्षाने विचार करावा. पवार आणि काँग्रेसचे नाते सारेच जाणतात. सोनियांच्या परदेशी नेतृत्वाचा मुद्दा पुढे करीत काँग्रेसला विरोध म्हणूनच पवार यांनी राष्ट्रवादीची मुहूर्तमेढ रोवली. मात्र, सत्तेसाठी त्याच काँग्रेसशी त्यांनी जुळवूनही घेतले. हे कसे विसरता येईल? त्यामुळे तूर्तास काँग्रेसला बाजूला ठेवले असले, तरी विरोधकांची आघाडी काँग्रेसमुक्त असेल, असे वाटत नाही. अर्थात त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाणार, हे निश्चित. देशात लोकसभेच्या निवडणुका 2024 मध्ये होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार या निवडणुकीत हॅटट्रिक करण्याच्या प्रयत्नात असेल. कोरोना व्यवस्थापन, देशाची आर्थिक स्थिती, इंधन दरवाढ, महागाई या मुद्यावर सरकारला घेरण्याचे विरोधकांचे मनसुबे आहेत. नव्या आघाडीची पायाभरणी, हे त्याचेच द्योतक. कुणी मान्य करो न करो. पण, वेळ जात नाही म्हणून काही ही मंडळी एकत्र आलीत, असे नाही. ’विरोधी पक्षांनी एकजूट व्हावे. विरोधी पक्षांची बाजू बळकट असून, जे शक्मय आहे ते केले पाहिजे. सर्वोत्तम स्थितीची वाट बघण्यात अर्थ नाही. काँग्रेसनेही गांभीर्य दाखवून सोबत आले पाहिजे. काँग्रेसने विरोधकांच्या एकजुटेत सहभागी व्हावे. एकत्र आल्याने शक्ती वाढेल. नेता कोण असेल यात पडू नये. सर्व मिळून पंतप्रधान निवडू,’ हे यशवंत सिन्हा यांचे आवाहन पुढची दिशा काय असेल, हे दाखविण्याकरिता पुरेसे आहे. अर्थात वेगवेगळय़ा पक्षातील नेत्यांना एकत्र आणणे, त्यांचे मूड सांभाळणे, सहमती घडविणे हे तसे सहज सोपे काम नाही. त्यात प्रत्येक जण सुप्तपणे नेतृत्वाची इच्छा बाळगून असेल, तर आघाडीत बिघाडी व्हायला असा किती वेळ लागतो. अशी ’नाना’ उदाहरणे अवतीभवती आहेतच. अर्थात पवारांसारख्या मुरब्बी व राजकारण कोळून प्यायलेल्या नेत्याला याची कल्पना असणार. अनेकांसाठी गुरुस्थानी असलेले पवार आपली गुरुत्वाकर्षण शक्ती दाखवून हा सत्तेचा प्रयोग तडीस नेणार काय, हेच आता पहायचे.
Trending
- राज्यात मंत्रीपदसह आठवले यांनी लोकसभेसाठी केला इतक्या जागांवर दावा
- ‘आय.एस.ओ मानांकित’ समाज कल्याण कार्यालयामध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा
- भीमा- कोरेगाव प्रकरणात फडणवीस यांना चौकशीला बोलवा; प्रकाश आंबेडकरांची मागणी
- पुणे शहरातून एकाचवेळी 12 गुन्हेगार तडीपार
- मेट्रोचे साहित्य चोरणाऱ्या महिलांसह पाच जण अटकेत
- हेमंत निंबाळकर यांची माहिती व जनसंपर्क विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती
- अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती; मान्सून लांबणार
- शिक्षण विभागातील लाचखोर अधिकाऱ्यांची उघड चौकशी करावी