सांगली / प्रतिनिधी
पुरोहित चेस अकॅडमी, सांगली यांच्या सहकार्याने क्लासेस् फॉर कॉमर्स करियर तर्फे आयोजित केल्या गेलेल्या ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेमध्ये पश्चिम बंगालचा प्रियांशु बरुआ हा विजेता ठरला. त्याने ८४ गुणांसह विजेतेपद पटकावले. तमिळनाडूचा मानांकित खेळाडू मिथुन आनंद हा ७३ गुणांसह उपविजेता ठरला. तमिळनाडूचाच मानांकित खेळाडू एम्. एस्. नवीन यास ७३ गुणांसह तृतीय स्थान प्राप्त झाले. महाराष्ट्राचा मानांकित खेळाडू अक्षत कारकर यास ७० गुणांसह चौथे स्थान प्राप्त झाले. तमिळनाडूचा मानांकित खेळाडू अरुल आनंद यास ६६ गुणांसह पाचवे स्थान प्राप्त झाले.
क्लासेस् फॉर कॉमर्स करियरचे चिंतामणी गोडबोले यांच्या तर्फे स्पर्धा पुरस्कृत करण्यात आली. पुरोहित चेस अकॅडमीचे प्रशिक्षक श्रेयस विवेक पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित केली गेली. तांत्रिक पंच म्हणून शार्दूल तपासे, दीपक वायचळ आणि सारंग विवेक पुरोहित यांनी काम पाहिले.