- मात्र बकरी ईदच्या दिवशी सर्व सुरू राहणार
ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक नवा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता पश्चिम बंगालमध्ये 31 ऑगस्टपर्यंत लॉक डाऊन वाढवण्यात आला आहे.

याबाबत माहिती देताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, या नव्या निर्णयानुसार, आठवड्यातील दोन दिवस संपूर्ण लॉक डाऊन असणार आहे. मात्र येणाऱ्या बकरी ईदनिमित्त लॉक डाऊन नसेल असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या एक ऑगस्ट रोजी म्हणजेच बकरी ईदच्या दिवशी लॉक डाऊन नसेल. राज्यात 2, 5, 8, 9, 16, 17, 23, 24 आणि 31 ऑगस्ट रोजी संपूर्ण लॉक डाऊन असेल.
दरम्यान, मागच्याच आठवड्यात सोमवारी ममता बॅनर्जी यांनी काही भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे सांगत राज्यात आठवड्यात दोन दिवस संपूर्ण लॉक डाऊन असल्याचे जाहीर केले होते.
सरकारकडून असे सांगण्यात आले होते की, राज्यात असे काही भाग आहेत जिथे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेषज्ञ, डॉक्टर, पोलिसांशी याबाबत बोलणे झाल्यानंतर कोरोनाचा संसर्गाची साखळी रोखण्यासाठी राज्यात दोन दिवस संपूर्ण लॉक डाऊनचा निर्णय जारी करण्यात आला आहे. या दोन दिवशी सर्व कार्यालये, परिवहन सेवा देखील बंद ठेवली जातील.