सहा सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात : जिल्हाधिकारी प्रशासक
प्रतिनिधी / कोल्हापूर
गेल्या दीड वर्षापासून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती बरखास्त होणार अशी चर्चा सुरू होती. राज्य शासनाच्या न्याय विधी विभागाने अखेर गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास समिती बरखास्त केल्याचे आदेश काढले. याचवेळी समितीवर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची प्रशासक म्हणून नियुक्तीही केली. त्यामुळे समितीचे अध्यक्ष भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्यासह 6 सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. याचवेळी समितीचा नवा अध्यक्ष कोण, सदस्यपदी संधी कोणाला मिळणार याचीही चर्चा सुरू झाली.
देवस्थान समितीच्या अखत्यारित कोल्हापुरसह सिंधुदुर्ग व सांगली या तीन जिल्हय़तील सुमारे 3 हजार 42 मंदिरे आहेत. समितीचे अध्यक्षपद प्रतिष्ठेचे मानले जाते. मात्र, 2010 ते 2017 या काळात समितीला अध्यक्षच नव्हते, पदाचा कार्यभार तत्कालिन जिल्हाधिकाऱयांकडे होता. राज्यात 2014 साली भाजप-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतरही पहिली 3 वर्षे समितीवर अध्यक्षांची नियुक्ती केली नव्हती. अखेर 16 ऑगस्ट 2017 रोजी तत्कालिन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे समर्थक महेश जाधव यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. याचबरोबर कोषाध्यक्ष म्हणून वैशाली क्षीरसागर, सदस्य म्हणून शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, राजाराम गरूड, चारूदत्त देसाई यांचीही टप्प्या टप्प्याने नियुक्ती झाली.
भाजपाला दणका
राज्यात दीड वर्षापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर सरकारने भाजपाचे अध्यक्ष व सदस्य असलेल्या राज्यस्तरीय समित्या व महामंडळे बरखास्त केली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर मात्र भाजपनियुक्त अध्यक्ष कार्यरत होते. अखेर गुरुवारी राज्य शासनाने अध्यक्षांसह समितीचा कार्यकाल संपुष्टात आणला. त्यानुसार महाविकास आघाडीने एकप्रकारे आमदार पाटील यांनाच धक्का दिल्याचे बोलले जाते.
महापालिकेची निवडणूक पार्श्वभूमीही या बदलाला कारणीभूत असल्याचे म्हटले जाते.