दुरूस्तीसाठी शहरात वीजपुरवठा खंडित
प्रतिनिधी /बेळगाव
दुरुस्तीच्या कारणास्तव रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 6 पर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. नववर्षाचा पहिलाच विकेंड अंधारात गेला. काहींना जनरेटर-इनव्हर्टरचा आधार मिळालेला असला तरी साप्ताहिक सुटी दिवशी लाईट नसल्याने नोकरदारांचा हिरमोड झाला.
रविवारी शहरातील अधिकतर भागात वीजपुरवठा ठप्प होता. रविवारी उद्योग कार्यालये बंद असल्यामुळे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. दुपारपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत केला जात होता. ज्यांच्याकडे इनव्हर्टरची व्यवस्था नाही त्यांची मात्र गैरसोय झाली. वीजपुरवठा नसल्यामुळे गृहिणींनाही मिक्सर, फ्रिजचा वापर करता आला नाही. चार्जिंग संपल्यामुळे अनेकांचे मोबाईलदेखील बंद पडले होते.
बाजारात जनरेटरची घरघर
वीजपुरवठा ठप्प असल्यामुळे व्यापाऱयांना जनरेटर सुरू करावे लागले. त्यामुळे बाजारपेठेत सर्वत्र जनरेटरची घरघर ऐकायला मिळत होती. साप्ताहिक सुटी असल्यामुळे खरेदीसाठी नागरिक बाजारात दाखल होत असल्याने व्यावसायिकांना दिवसभर जनरेटरच्या साहाय्याने व्यवसाय करावा लागला. यामुळे डिझेल व पेट्रोलसाठी अतिरिक्त खर्च करावा लागला.