ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

त्या म्हणाल्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजूनही शाळा बंद आहेत, तरी शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू करण्यात आले. ऑनलाइन माध्यमातून हे शिक्षण देत असताना त्याला सुद्धा काही मर्यादा आहेत. त्यात अभ्यासक्रम पूर्ण कसा होईल, याबाबत प्रश्न विद्यार्थी शिक्षकांना पडलेला पाहायला मिळत होता. त्यामुळे हा निर्णय घेतला गेला.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आता नक्कीच दिलासा मिळणार आहे. कारण दहावी आणि बारावी बोर्डाचा अभ्यास करताना अभ्यासक्रम लवकर संपवण्याचा प्रयत्न असतो. त्यात आता अभ्यासक्रम कमी केल्याने वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य होईल.
कपात करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाची यादी संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.