मुंबई/प्रतिनिधी
राणे पिता-पुत्र हे वारंवार महाविकास आघाडीमधील नेत्यांवर टीका करत असतात. निलेश राणे यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. या आरोपांबद्दल आपण चंद्रकांत पाटील यांच्यावर सव्वा रुपयांचा दावा ठोकणार आहोत. त्यांची तेवढीच किंमत आहे, असे राऊत म्हणाले. राऊत यांच्या या विधानानंतर माजी खासदार आणि नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांनी संजय राऊतांना लक्ष्य करणारं टि्वट केलं आहे.
“संजय राऊत मूर्ख आहेत. आपण जेव्हा कोणावर नुकसानीचा दावा टाकतो तेव्हा आपल्या योग्यतेनुसार नुकसानीची किंमत ठरते. संजय राऊत यांची स्वतःची किंमत ही सव्वा रुपये आहे. पहिल्यांदा संजय राऊत यांनी स्वतःची किंमत ओळखली” असं निलेश राणे यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दैनिक ‘सामना’ला पत्रं पाठवून शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांनी “मला ईडीचा अनुभव नाही. तो येण्यासाठी भरपूर काळा पैसा असावा लागतो. आर्थिक गैरव्यवहार केले की, ईडीचा अनुभव येतो. तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले पन्नास लाख रुपये मिळाले आणि या बेहिशेबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर तुम्ही हैराण झाला होता. अखेर बरीच धावपळ करून, ते पैसे परत देऊन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न तुम्ही धापा टाकत केलात. हे सर्व पाहिल्यावरून मी अंदाज बांधला की पन्नास लाखांसाठी एवढा त्रास होत असेल तर १२७ कोटींसाठी नक्कीच फेस येणार,” असं पाटलांनी म्हटलंय.”