दुसऱया कसोटीत द.आफ्रिकेवर 95 धावांनी मात,
वृत्तसंस्था/ रावळपिंडी
मध्यमगती गोलंदाज हसन अलीने पहिल्यांदाच सामन्यात दहा बळी घेण्याचा पराक्रम केला. त्याच्या या कामगिरीच्या बळावर पाकने दुसऱया कसोटीत द.आफ्रिकेवर 95 धावांनी विजय मिळवित मालिका 2-0 अशी एकतर्फी जिंकली. 2003 नंतर दक्षिण आफ्रिकेवर पाकने मिळविलेला हा पहिलाच मालिकाविजय आहे. हसनला सामनावीर तर मोहम्मद रिझवानला मालिकावीराचा बहुमान मिळाला.
हसन अलीने दुसऱया डावात 60 धावांत 5 बळी मिळवित सामन्यात 114 धावांत 11 बळी मिळविले. पाकने द.आफ्रिकेला विजयासाठी 370 धावांचे आव्हान दिले होते. चौथ्या दिवशी द.आफ्रिकेने 1 बाद 127 अशी चांगली सुरुवात केली होती. पण शेवटच्या दिवशी त्यांचा डाव चहापानाआधी 274 धावांत आटोपला. हसनचा जोडीदार शाहीन आफ्रिदीने 51 धावांत 4 बळी मिळवित त्याला चांगली साथ दिली तर स्पिनर यासिर शहाने शेवटचा बळी मिळवित पाकचा विजय साकारला. द.आफ्रिकेचा सलामीवीर ऐडन मार्करमने झुंजार शतक नेंदवताना 108 धावा जमविल्या तर टेम्बा बव्हुमाने 61 धावांचे योगदान दिले. उपाहाराआधी द.आफ्रिकेने 3 बाद 219 धावा जमविल्या होत्या आणि विजयासाठी अजून 151 धावांची गरज होती. पण हसनने भेदक मारा केल्याने उपाहारानंतर त्यांची मधली फळी कोसळली. त्यांचे सात फलंदाज केवळ 33 धावांत बाद झाले.

नवा चेंडू घेतल्यानंतर हसनने दुसऱयाच षटकात पाचवे कसोटी शतक नोंदवणाऱया मार्करमचा प्रतिकार मोडून काढताना त्याला स्लिपमध्ये झेलबाद केले. त्याने 335 मिनिटांच्या खेळात 13 चौकार, 3 षटकार मारले. पुढच्याच चेंडूवर क्विन्टॉन डी कॉक स्लिपमध्येच शून्यावर झेलबाद झाला. डी कॉक या मालिकेत पूर्ण अपयशी ठरला असून त्याने फक्त 46 धावा जमविल्या. नंतर हसनने जॉर्ज लिन्डेला 4 धावांवर बाद करीत वैयक्तिक पाचवा बळी मिळविला. यापूर्वी त्याने 2018 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 83 धावांत 7 बळी घेण्याची सर्वोत्तम कामगिरी केली होती. सकाळी तिसऱयाच चेंडूवर हसनने एका अप्रतिम इनस्विंगरवर डय़ुसेनला बाद केले तर पाचव्या षटकात डय़ु प्लेसिसला त्याने पायचीत केले. डय़ु प्लेसिसलाही या मालिकेत चमक दाखविता आली नाही. त्याने चार डावात फक्त 55 धावा जमविल्या. पाकने दक्षिण आफ्रिकेवर 12 प्रयत्नात मिळविलेला हा दुसरा मालिकाविजय आहे. आठ त्यांनी गमविल्या तर तीन अनिर्णीत राहिल्या होत्या. यापूर्वी 2003 मध्ये मायदेशात झालेल्या दोन सामन्यांची मालिका पाकने जिंकली होती.
या मालिकाविजयानंतर आयसीसी कसोटी मानांकनात पाकने पाचव्या स्थानावर मजल मारली असून जानेवारी 2017 नंतर पहिल्यांदाच ते टॉप पाचमध्ये दाखल झाले आहेत. द.आफ्रिकेची पाचवरून सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. याच दोन संघांत आता तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार असून तीनही सामने लाहोरमध्ये 11, 13, 14 फेबुवारी रोजी होणार आहेत.
संक्षिप्त धावफलक ः पाक प.डाव 272, द.आफ्रिका प.डाव 201, पाक दु.डाव 298, द.आफ्रिका दु.डाव 91.4 षटकांत सर्व बाद 274 ः मार्करम 108 (243 चेंडूत 13 चौकार, 3 षटकार), एल्गार 17, डय़ुसेन 48, डय़ु प्लेसिस 5, बव्हुमा 61 (125 चेंडूत 6 चौकार), डी कॉक 0, मुल्डर 20 (40 चेंडूत 3 चौकार), लिन्डे 4, केशव महाराज 0, रबाडा 0, नॉर्त्जे 2, अवांतर 9. गोलंदाजी ः शाहीन आफ्रिदी 4-51, हसन अली 5-60, यासिर शहा 1-56, नौमन अली 0-63, अश्रफ 0-37.