ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात येत्या 28 मार्चला अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे इम्रान खान अविश्वास ठरावात बहुमत सिद्ध करण्यासाठी धडपड करत असतानाच दुसरीकडे विरोधी पक्ष मात्र आपली वेगळी रणनीती आखत आहेत. काही पक्षांनी तर नव्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत चर्चा सुरू केली आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझने (पीएमएल-एन) आपल्या पंतप्रधानपदाचा उमेदवारही जाहीर केला आहे.
माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पक्षाने म्हणजेच पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझने शहबाज शरीफ यांना नव्या पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केले आहे. नवाज शरीफ यांची मुलगी आणि पक्षाची उपाध्यक्ष मरियम नवाझ यांनी शरीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर झालेल्या पत्रकार परिषदेत मरियम म्हणाल्या की, इम्रान खान हे अविश्वास प्रस्तावामुळे संसदेतील अधिवेशनाला विलंब करण्याच्या प्रयत्नात होते. हे स्पष्टपणे संविधानाचे उल्लंघन होते. असे झाल्याने आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. आता इम्रान खान यांचा खेळ संपला आहे. त्यांचा पक्ष फुटला आहे आणि त्यांनाही माहिती आहे, की त्यांना वाचविण्यासाठी कोणी पुढे येणार नाही.
विरोधी पक्ष एकत्रित पंतप्रधानपदासाठी पुढील उमेदवाराच्या नियुक्तीबाबत निर्णय घेतील. पण सरकार पडले तर पंतप्रधानपदासाठी पीएमएल-एनचे नेते शहबाज शरीफ हेच पक्षाचे उमेदवार असतील. इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव पारित करण्यास सफल होण्याची आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.