प्रतिनिधी / सोलापूर
पाणथळाचे योग्य संवर्धन झाल्यास पाणी पातळी वाढण्यास मोठी मदत होते, त्याचबरोबर जलप्रदूषण टाळण्यासाठी देखील पाणथळाचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे स्पष्ट मत ग्रीक देशातील टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ क्रेटे येथील पाणथळचे अभ्यासक डॉ. अलेक्झांडर स्टेफनकिस यांनी व्यक्त केले.
मंगळवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भूशास्त्र संकुलामधील पर्यावरणशास्त्र विभागामार्फत जागतिक पाणथळ दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते, यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अलेक्झांडर हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांनी प्रास्ताविक व स्वागत करत मान्यवरांचा परिचय करून दिला.
डॉ. अलेक्झांडर म्हणाले की, या सृष्टीत पाणथळाचे योगदान फार मोठे आहे. तापमान वाढ रोखण्यासाठीही पाणथळाचा वापर होतो. जैवविविधता पाणथळामुळे वाढू शकते. कारखान्यांमधील प्रदूषित पाणी देखील पाणथळामुळे स्वच्छ होऊ शकते. त्यामुळे सर्वांनी पाणथळाच्या संवर्धनासाठी काम करावे. विद्यार्थी, अभ्यासकांसाठी संशोधनामध्ये याक्षेत्रात संधी आहेत, असेही डॉ. अलेक्झांडर यांनी यावेळी सांगितले.
कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी पाणथळाचे अर्थशास्त्रीय महत्त्व स्पष्ट करीत कृषिपूरक पाणथळे समाजासाठी फायदेशीर असतात, असे सांगितले. पाणी स्वच्छ करण्यासाठी पाणथळे उपयोगी पडतात.
जैवविविधतेच्या समृद्धीसाठी मानवनिर्मित पाणथळे वाढणे आवश्यक असून अभ्यासक व संशोधकांनीही या क्षेत्रात आपले योगदान द्यावे. विविध प्रकल्पांवर अभ्यासकांनी काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या वेबिनारचे समन्वयक डॉ. विनायक धुळप यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. या ऑनलाइन कार्यक्रमात सतराशे जणांनी सहभाग नोंदविला.