फुटपाथवर बसविलेले फलक-ग्रील हटविण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील विविध चौकांचे सुशोभिकरण करून पादचारी आणि वाहनधारकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. युनियन जिमखान्याकडे जाणाऱया रस्त्यावर राजेंद्र प्रसाद चौकात फुटपाथ निर्माण करून पादचाऱयांच्या सुरक्षेसाठी ग्रील बसविण्यात आले आहे. मात्र सदर फुटपाथचा वापर पादचाऱयांऐवजी कचरा टाकण्यासाठी होत असल्याने येथील ग्रील हटविण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
युनियन जिमखाना रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. त्यामुळे रस्त्याची देखभाल सार्वजनिक बांधकाम खात्याकडून करण्यात येते. रस्त्याचे डांबरीकरण आणि विकासकामे राबविताना राजेंद्र प्रसाद चौकात पादचाऱयांसाठी फुटपाथ निर्माण करण्यात आले होते. हा रस्ता वर्दळीचा असल्याने निर्माण करण्यात आलेल्या फुटपाथशेजारी सुरक्षेच्यादृष्टीने ग्रील उभारण्यात आले आहेत. दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर तसेच दुभाजकावर ग्रील उभारण्यात आले. पण दुभाजकावर असलेल्या ग्रीलला वाहनांची ठोकर बसल्याने खराब झाले आहे. तर फुटपाथवर बसविण्यात आलेल्या ग्रीलच्या मध्यभागी हद्दीचे तसेच विविध फलक लावण्यात आले असल्याने पादचाऱयांना फुटपाथचा वापर करता येत नाही. परिणामी फुटपाथचा गैरवापर होत असून याठिकाणी कचरा टाकण्यात येत आहे.
वास्तविक पाहता ग्रीलमुळे रस्ता अरुंद बनला असून फुटपाथचा वापर होत नाही. पादचारी रस्त्यावरून चालत जातात. पादचाऱयांमुळे वाहनधारकांनादेखील अडथळा निर्माण होत आहे.
ग्रील हटवून रस्ता मोठा केल्यास पादचाऱयांसह वाहनधारकांना सोयीचे
येथील ग्रील हटवून रस्ता मोठा केल्यास पादचाऱयांसह वाहनधारकांना सोयीचे होईल. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांनी या ठिकाणी निर्माण होणाऱया समस्येची पाहणी करून आवश्यक उपाययोजना राबविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.