मृतदेहाचे केले 35 तुकडे ः प्रेयसी मूळची मुंबईची ः लव्ह जिहादचा बळी?
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत 6 महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येप्रकरणी खळबळजनक खुलासा झाला आहे. आफताब अमीन पुनावालाने लिव्ह इन पार्टनर आणि प्रेयसी श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि हे तुकडे तो 18 दिवसांपर्यंत दिल्लीच्या विविध भागांमध्ये फेकत होता. पोलिसांनी आरोपी आफताबला अटक केली आहे. एक वर्षापूर्वी श्रद्धा ही आफताबसोबत राहण्यासाठी मुंबईहून दिल्लीत दाखल झाली होती. 26 वर्षीय श्रद्धा ही मुंबईतील मालाड येथील रहिवासी होती. तसेच ती एका मल्टीनॅशनल कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होती.
श्रद्धा आणि आफताब दोघेही एकाच कॉल सेंटरमध्ये काम करत होते. दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले होते. परंतु त्यांच्या या नात्याला कुटुंबीयांचा विरोध होता. याचमुळे दोघेही मुंबईहून दिल्लीत रहायला गेले होते. दिल्लीतील एका फ्लॅटमध्ये ते लिव्ह इनमध्ये राहत होते.
भांडणानंतर केली हत्या
18 मे रोजी झालेल्या भांडणानंतर आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि ते फ्रीजमध्ये ठेवले. आफताब दररोज रात्री 2 वाजता घरातून बाहेर पडत मृतदेहाच्या तुकडय़ांची दिल्लीच्या विविध भागांमध्ये विल्हेवाट लावत होता, अशी माहिती दक्षिण दिल्लीचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अंकित चौहान यांनी दिली आहे.
कुटुंबीयांची दिल्लीत धाव
18 मेनंतर श्रद्धाच्या फोनवर केलेला कॉल कुणीच रिसिव्ह करत नव्हते. यामुळे चिंताग्रस्त झालेले तिचे वडील विकास मदान हे 8 नोव्हेंबरला दिल्लीत पोहोचले. मुलीच्या फ्लॅटवर पोहोचल्यावर दरवाजाला कुलूप लावलेले दिसून आले. मुलीसोबत काहीतरी वाईट घडल्याचा संशय आल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती.
गुन्हय़ाची कबुली
वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आफताबला ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्याने गुन्हय़ाची कबुली दिली आहे. श्रद्धासोबत वारंवार भांडणे व्हायची. ती विवाह करण्यासाठी दबाव टाकत होती. याचमुळे वैतागून तिची हत्या केल्याचे आफताबने चौकशीदरम्यान सांगितले आहे. पोलिसांनी आता हत्येचा गुन्हा नोंदवून मृतदेहाचा शोध चालविला आहे.
डेक्सटर वेबसीरिज पाहिल्यावर ‘प्लॅन’
श्रद्धा आणि आफताब हे दिल्लीत आल्यावर प्रथम एका हॉटेलात एक दिवसासाठी वास्तव्यास होते. मग महरौली येथील एका फ्लॅटमध्ये 15 मेपासून भाडय़ाने राहू लागले होते. 18 मे रोजी आफताबने श्रद्धाची हत्या केली आहे. आफताबने डेक्सटर वेबसीरिज पाहून ही हत्या केली आहे. या वेबसीरिजमुळेच त्याला मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची कल्पना सुचली होती. कॉल सेंटरमध्ये काम करण्यापूर्वी आफताब हा शेफ म्हणून काम करत होता.