वार्ताहर /पालये
महिला व बालकल्याण विभाग पेडणे, स्वयंपूर्ण मित्र, पालये ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ या उपक्रमांतर्गत पालये येथील श्री भूमिका वेताळ मंदिराच्या सभामंडपात महिलांसाठी अर्धदिवशीय शिबिर घेण्यात आले. महिला व बालकल्याण खात्यातर्फे विविध सरकारी योजना राबविल्या जातात त्याची सविस्तर माहिती या शिबिरात देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी सीडीपीओ पेडणे विभाग प्रतिभा मळीक, सरपंच उदय गवंडी, उपसरपंच उर्मिला तिळवे, पंचायतसदस्य सागर तिळवे, तारिका तारी, सचिव प्रीतम सावंत, देवस्थान समितीचे अध्यक्ष एकनाथ परब, स्वयंपूर्ण मित्र नंदकुमार परब यांची उपस्थिती होती.
महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून ज्या योजना राबविल्या जातात त्याद्वारे स्वतःचा व स्वयंपूर्ण गटाचा आर्थिक विकास कशाप्रकारे साधू शकतो यावर प्रतिभा मळीक यांनी मार्गदर्शन केले. लघुउद्योगावर भर देण्याचे त्यांनी आवाहन केले. एकात्मिक बाल विकास सेवा योजना, निराधार विधवांच्या आर्थिक उन्नतीसाठीच्या योजना, पूरक पोषण आहार, दयानंद निराधार योजना, लाडली लक्ष्मी व स्वावलंबन योजना आदी सरकारी योजनेसंबंधीची माहिती व त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
गावातील महिलांनी आपल्या बचत गटापुरतेच मर्यादित न राहता पुढे होऊन स्वावलंबन योजनेद्वारे मिळणाऱया निधीचा योग्यपद्धतीने उपयोग करून आपला व गटातील सर्वांचा आर्थिक विकास साधावा, असे आवाहन स्वयंपूर्ण मित्र नंदकुमार परब यांनी केले.
या कार्यक्रमात गावातील महिला मंडळे, स्वयंसाहाय्य गट, ग्रामस्थ व स्त्री शक्ती गटाच्या सभासदांनी आपली उपस्थिती दर्शविली. आपल्या शंकांचेही उपस्थित अधिकाऱयांकडून निरसन करून घेतले.
शिबिर यशस्वीतेसाठी स्वयंपूर्ण मित्र नंदकुमार परब, पालये ग्रामपंचायतीतर्फे परिश्रम घेण्यात आले. प्रास्ताविक तारिका तारी यांनी केले, तर श्री. परब यांनी आभार मानले.