ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील घरावर आज केंद्रीय आयकर विभागाने छापा टाकला. पहाटेपासून जाधव यांची चौकशी सुरू असून, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. महिनाभरात पालिका निवडणुका होणार आहेत, प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे पालिकेच्या शिपायांवरही धाडी टाकल्या जातील. कारण ते खिशावर धनुष्यबाण लावतात, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
राऊत म्हणाले, महापालिका निवडणुकीची प्रक्रिया महिनाभरामध्ये सुरु होणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या शिपायांवरही धाडी टाकल्या जातील, कारण ते खिशाला धनुष्यबाण लावतात. मराठी माणुस असल्यामुळे ते धनुष्यबाण लावतात. त्यांचे शिवसेनेवर प्रेम आहे. दरम्यान, आमच्यावरही खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. ते आम्हाला 2024 पर्यंत सहन करायचे आहे. महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि पंजाबलाही सहन करायचे आहे.
भाजपकडून निवडणुकीचं गलिच्छ राजकारण सुरु आहे. निवडणूक जिंकता आली नाही, सत्ता नसल्याने केंद्रीय तपास यंत्रणांचा तसंच राज्यपाल भवनाचा गैरवापर केला जात आहे, असेही राऊत म्हणाले.