बेकरीवाल्यांकडे नाही अन्य कोणता पर्याय गोव्याच्या पारंपरिक पावांकडे सरकारचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /मडगाव
‘पावा’विना गोवेकरांचा सकाळचा नाश्ता होत नाही. पाव हा गोवेकरांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. तोच पाव आत्ता 2 ऑक्टोबरपासून महाग होणार आहे. सर्वच क्षेत्रात महागाई आलेली आहे. ‘पावा’साठी लागणारा कच्चा माल देखील महाग झाल्याने पावाचे दर वाढविण्याशिवाय बेकरीवाल्यांकडे पर्याय राहिलेला नाही अशी माहिती ऑल गोवा बेकर्स असोसिएशनचे अध्यक्ष पीटर फर्नांडिस यांनी दिली आहे.
सध्या प्रति पावाचा होलसेल दर 3.20 रूपये तर किरकोळ दर 4 रूपये आहे. मात्र, 2 ऑक्टोबरपासून हा दर घाऊक पद्धतीने पाव खरेदी 4 रूपये तर किरकोळ खरेदी केल्यास 5 रूपये दर आकारला जाणार आहे. यापूर्वी देखील पावाचे दर वाढविण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्यावेळी सरकारने पावाचे महत्व ओळखून पाव तयार करणाऱया बेकरीवाल्यांसाठी आवश्यक सुविधा तसेच सबसिडी देण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात सुविधा व सबसिडीचा लाभ बेकरी मालकांना अद्याप मिळालेला नाही.
लाकूड, आधारभूत किंमत द्यावी
पावाचे दर नियंत्रणात ठेवायचे झाल्यास सरकारने बेकरीवाल्यांच्या पुढील मागण्यांचा त्वरित विचार करावा अशी मागणी पीटर फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेत केली. पावाच्या भट्टीसाठी लागणारे जळावू लाकूड स्वस्त दरात उपलब्ध करावे तसेच गोव्यात जळावू लाकूड उलपब्ध होत नसल्याने शेजारील राज्यातून लाकूड वाहतूक करण्यासाठी सुलभरित्या परवाना द्यावा, बेकरीवाल्यांना आधारभूत किंमत द्यावी, जशी नारळ, ऊस व काजूचे उत्पादन घेणाऱया शेतकऱयांना दिली जाते तशी.
बेकरीवाल्यांच्या हिताच्या अनेक मागण्या
दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेतंर्गत खास गटातून प्राधान्य देण्यात यावे. जुन्या झालेल्या बेकरी दुरूस्त करण्यासाठी परवाना देताना एक खिडकी योजना मार्गी लावावी, जेणेकरून बेकरी मालकांना त्रास होणार नाही. बेकरीवाल्यांसाठी विमा योजना तसेच निवृत्तीनंतर आर्थिक सहाय्य पुरविणे, बेकरीत काम करणाऱया कामगारांसाठी पेन्शन योजना राबविणे, बेकरीचा दर्जा वाढविण्यासाठी सुलभरित्या परवाना देणे, कॅटरिंग कॉलेजमध्ये बेकरीवाल्याच्या मुलांसाठी खास कोटा नियुक्त करणे, ज्यातून मुलांना आधुनिक बेकरीचे ज्ञान प्राप्त करणे शक्य होईल.
गोमंतकीय पारंपरिक पावांना प्रोत्साहन देण्याची गरज
बेकरीसाठी यंत्रसामुग्री खरेदी, वीज, गॅस, ओवन्स, वाहन यावर सरकारने सबसिडी द्यावी, सरकारने बांधकाम केलेल्या इमारतीत तसेच स्थानिक पंचायती व नगरपालिकांच्या इमारतीत बेकरीवाल्यांना आपले स्टॉल्स घालण्यास प्रोत्साहन देणे, या स्टॉल्समधून पाव, पोळी, उंडे व पानके तसेच इतर अस्सल गोमंतकीय पद्धतीचे खाद्य पदार्थांची विक्री करणे शक्य होईल. तब्बल 19 मागण्या ऑल गोवा बेकर्स असोसिएशने सरकारला सादर केल्या असून या मागण्या त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली आहे.