ऑनलाईन टीम / पिंपरी :
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा धोका वाढला आहे. शनिवारी एकाच दिवशी नवीन सहा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्ण संख्या आता पुन्हा नऊवर गेली आहे. पाच वायसीएमधील आणि एकजण खासगी रुग्णालयात दाखल होता. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबत माहिती दिली.
दहा दिवसांच्या ब्रेकनंतर मागील तीन दिवसांपासून पुन्हा शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी जमात मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमांतून आलेल्या दोघांना गुरुवारी आणि त्यांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील एकाला शुक्रवारी अशा तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांनतर आज पुन्हा एकाचदिवशी सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पिंपरीतील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 9 वर पोहचली आहे. यापूर्वी पिंपरी-चिंचवडमधील 12 कोरोना रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत.