सॅनिटायझर, मास्क, पीपीई किट बनवून जास्त नफा मिळवण्याचे अमिष
कोल्हापूर / प्रतिनिधी
कोरोना काळात सॅनिटायझर, हँडग्लोज, मास्क, पीपी किट, फेस शिल्डची ऑर्डर देण्याच्या अमिषाने 1 कोटी 5 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पिता पुत्रांसह 4 चौघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रोहीत हरिष नागदेव, राहूल हरिष नागदेव, हरिष बलीराम नागदेव (हॉकी स्टेडियम, महालक्ष्मी पार्क), शाम पल्लोद अशी त्यांची नावे आहेत. 3 मे 2021 ते आज अखेर ही घडना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष पोवार, जिलानी मुल्ला, समीर भालदार यांचे डायमंड मोटर्स नावाचे मोटार खरेदी विक्रीचे कार्यालय आहे. 3 मे 2021 रोजी रोहीत नागदेव हा डायमंड मोटर्सच्या कार्यालयात मोटार खरेदी करण्याच्या बहाण्याने आला. त्याने या तिघांशी मोटार खरेदी करण्याच्या बहाण्याने ओळख केली. यानंतर या ओळखीतून या तिघांशी मैत्री केली. या तिघांचाही विश्वास संपादन करुन आपण चौघे मिळून सॅनिटायझर, हँडग्लोज, पीपीई किट, ऑक्सीमीटर, फेस शिल्ड, मास्क याचा व्यवसाय करु. सध्या कोरोना काळात याला चांगली मागणी आहे. याचे आपल्याकडे खरेदीदारही असल्याची बतावणीही केली. यामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे रोहीतने सांगितले. यावेळॅ संतोष पोवार, जिलानी मुल्ला, समीर भालदार यांनी एकत्रित पैसे गुंतवण्याचे ठरविले. रोहीत, राहूल वडील हरिष नातेवाईक शाम हे डायमंड मोटर्सच्या कार्यालयात आले. त्यांची एकत्रित बैठक झाली. यानंतर या सर्वांनी व्यवसाय सुरु केला. तिघांनी मिळून 1 कोटी 5 लाख रुपये व्यवसायात गुंतविले. रोहीतने मे महिन्यापासून उत्पादन सुरु केले असल्याचे सांगून त्यांना काही रक्कम परतावा स्वरुपात दिली. काही कालावधीनंतर मात्र नागदेव बंधूंनी पैसे देणे बंद केले. यानंतर संतोष पोवार यांनी वारंवार गुंतविलेल्या रकमेसाठी नागदेव यांच्याकडे मागणी केली. मात्र त्यांनी रक्कम देण्यास नकार दिला. यामुळे संतोष पोवार यांनी याबाबतची फिर्याद शाह्tपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली.