पोलीस वडिलांच्या ताब्यातील.पिस्तूल हाताळताना घडली घटना,वासुदेवनगर-डिचोलीतील हृदयद्रावक घटना : सर्वत्र हळहळ
डिचोली/प्रतिनिधी
गोवा राज्यात येणाऱया अतिमहनीय व्यक्तींच्या सुरक्षारक्षक ताफ्यात असलेल्या एका पोलीस हवालदाराच्या चार वषीय मुलाच्या हातून वडिलांच्याच ताब्यात असलेले ग्लॉक पिस्तूल हाताळताना चुकून त्याच्यावरच गोळी सुटली. या घटनेत हा बालक जागीच गतप्राण झाला. या पिस्तुलमध्ये दहा गोळय़ा होत्या, त्यातील चुकून एक गोळी सुटली. या घटनेने संपूर्ण डिचोली तसेच परिसरात खळबळ माजली आणि सर्वत्र याच घटनेची चर्चा सुरू झाली. या घटनेमुळे डिचोलीत सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
इकॉनॉमिक ऑफेन्स सेलमध्ये कार्यरत असलेले दशरथ वायंगणकर हे पोलीस हेड कॉन्स्टेबल वासुदेवनगर-डिचोली येथील एका इमारतीत दुसऱया मजल्यावर राहतात. त्यांच्या चार वषीय मुलाच्या हातून सदर चूक घडली आणि या अनपेक्षित अशा हृदयद्रावक घटनेत निष्पाप मुलाचा नाहक बळी गेला. सदर घटना गुरुवार दि. 28 रोजी रात्री घडली. गंभीर जखमी अवस्थेत सदर मुलाला डिचोलीतील सरकारी सामाजिक आरोग्य केंद्रात आणले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
वडील बाथरूममध्ये असताना बॅगेतील काढले पिस्तूल
राज्यात आलेल्या उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या सुरक्षा ताफ्यातील आपली डय़ुटी बजावल्यानंतर गुरुवार 28 रोजी रात्री दशरथ हे डिचोलीतील आपल्या घरी आले. फ्लॅटमधील एका बेडरूममध्ये खुर्चीवर आपले सर्व सामान ठेवून ते बाथरूममध्ये गेले. तेथे शेविंग करीत असतानाच मोठय़ाने आवाज झाला. धावत बाथरूममधून बेडरूममध्ये येईपर्यंत लहान मुलगा रक्ताच्या थारोळय़ात पडलेला त्यांना दृष्टीस पडला. दुसऱया बाजूने किचनमध्ये असलेली त्या मुलाची आई धावतच आली आणि एकच धावपळ उडाली. रक्ताच्या थारोळय़ात पडलेल्या मुलाला घेऊन ते थेट इस्पितळात दाखल झाले. परंतू तोपर्यंत सर्व काही संपले होते. डॉक्टरांनी त्या कोवळय़ा जीवाला मृत घोषित केले.
जवळ कोणीच नसताना काळाने गाठले
सदर घटना घडली त्यावेळी सदर चार वर्षाच्या मुलाजवळ कोणीही नव्हते. वडील बाथरूममध्ये दाढी करत होते. आई किचनमध्ये स्वयंपाकाच्या कामात व्यस्त होती. तर दहा वषीय मोठा मुलगा इतरत्र कुठेतरी होता. नेमके त्याचवेळी या चिमुकल्याला वडिलांची बॅग दृष्टीस पडली आणि त्याने त्यातील पिस्तूल हातात घेतली आणि सर्वकाही होत्याचे नव्हते होऊन बसले.
डाव्या डोळय़ाच्या खाली रूतली गोळी
बॅगेतील पिस्तूल हातात घेतल्यानंतर सदर मुलाला वडिलांच्या कामातील पिस्तूल असल्याने कुतूहल वाटलेच असावे. कारण त्यांच्या घरात दोन्ही भावा-भावांमध्ये खेळणीतल्या पिस्तुलांनी खेळ चालूच असायचा. पंचनामा करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना घरात खेळण्यातील पिस्तुलेही मिळाली आहेत. या वडिलांच्या पिस्तूलाचे कुतूहल वाटल्याने खेळताना ज्याप्रमाणे ट्रिगर ओढला जातो, त्याचपद्धतीने सदर पिस्तुलाचा ट्रिगर मुलाने ओढला. परंतु त्याचा वेळ फोल ठरला. कारण पिस्तुलाचे दर्शनी भोक मुलाच्या तोंडाकडे होते आणि ट्रिगर दाबताच आतून सुटलेली गोळी थेट त्याच्या तोंडावर डाव्या डोळय़ाच्या खालच्या भागात रूतली आणि मानेतून बाहेर पडली. या चार वषीय कोवळय़ा मुलाचा जीव जाण्यासाठी तेवढाच फटका पुरेसा होता आणि नेमके तेच झाले.
अन् गॅसवरील भजी तशीच राहिली
रात्री डय़ुटी संपवून पती घरात आलेले. सकाळी पुन्हा डय़ुटीवर रूजू होण्यास जाणार असल्याने रात्रीचे जेवण लवकर व्हावे म्हणून पत्नी स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यात मग्न होती. त्या किचनमध्ये स्वयंपाक करीत असताना भजी तळत होत्या. तर दशरथ हे बाथरूममध्ये दाढी करत होते. त्याचवेळी घडलेल्या या प्रकाराने संपूर्ण घरच हादरून गेले. एकच धावपळ उडाली. रक्ताच्या थारोळय़ात पडलेल्या आपल्या मुलाला पाहून पालक गर्भगळीत झाले. त्याच अवस्थेतच त्याला इस्पितळात नेण्याची घाई अन् इस्पितळात मुलाला मृत घोषित केल्यानंतर सर्व काही सुन्न झाले. घरातील सर्व सामान आहे तसेच पडून होते. पोलीस पंचनाम्यासाठी फ्लॅटमध्ये पोहोचले असता किचनमध्ये गॅसवर भजी तळण्यासाठी ठेवलेली भांडी, इतर सामान, काढलेली भजी, कालवलेले पीठ ‘जैसे थे’ परिस्थितीत होती. संपूर्ण घरच शांत झाले होते.
अनैसर्गिक मृत्यू म्हणून पोलीस स्थानकात प्रकरण नोंद
सदर प्रकरण सध्या डिचोली पोलीस स्थानकात अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आले आहे. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून तो घरच्यांच्या स्वाधीन करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणातील पिस्तूल जप्त केले आहे. पुढील तपास डिचोली पोलीस उपअधीक्षक संदेश चोडणकर व निरीक्षक महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक मनिषा पेडणेकर करीत आहेत.
घडल्या प्रकाराने संपूर्ण डिचोली परिसर अस्वस्थ
त्या चार वषीय फुलासारख्या मुलाचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत व्हावा ही बाब कुणाच्याही मनाला न पटणारीच आहे. सकाळी ज्यावेळी ही बाब संपूर्ण डिचोली परिसरात पसरली त्यावेळी प्रत्येकाच्या चेहऱयावर दुःखद भावच दिसून येत होते. काळजाचा ठेका चुकवणारी तसेच हृदय पिळवटून टाकणाऱया या घटनेमुळे डिचोली तसेच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. संपूर्ण शहरात याच घटनेची चर्चा होती.
कारापूर येथे अंत्यसंस्कार
उत्तरीय तपासणीअंती दुपारी मृतदेह घरच्यांच्या स्वाधीन करण्यात आल्यानंतर काल शुक्र. दि. 29 रोजी दशरथ यांच्या कारापूर येथील मूळ घरी त्याच्यावर अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यंस्कार करण्यात आले. माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्यासह अनेकांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. दशरथ वायंगणकर हे एक कर्तव्यदक्ष आणि कर्तबगार असे पोलीस कर्मचारी म्हणून परिचित आहेत. यापूर्वी ते माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे सुरक्षारक्षक म्हणून डय़ुटीवर होते. आपले कर्तव्य चोखपणे बजावताना कोणत्याही चुका घडू नयेत म्हणून ते काळजी घेत. सुरक्षारक्षक डय़ुटीवर रूजू होताना सदर ग्लॉक पिस्तूलचा ताबा आपण घेत असल्याचे पत्रही त्यांनी खात्याला केले होते. परंतु मुलाच्या हाताला सदर पिस्तूल लागले आणि नियतीने डाव साधला.