हाथरस / वृत्तसंस्था
दोन दिवसांपूर्वी हाथरसमध्ये जाण्यास अटकाव करण्यात आलेल्या राहुल-प्रियंका गांधी या द्वयींना शनिवारी कडक सुरक्षा बंदोबस्तात पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यास अनुमती देण्यात आली. सरकारच्या परवानगीनंतर सायंकाळी उशिराने हाथरसमध्ये दाखल झालेल्या राहुल-प्रियंकाने पीडितेच्या कुटुंबियांची गळाभेट घेत त्यांचे सांत्वन केले. तसेच प्रियंका गांधी यांनी पीडितेच्या मातेशी बंद दरवाजाआड काही वेळ चर्चा केल्याची माहितीही उपलब्ध झाली आहे.
हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. अन्यायाविरोधात लढाई सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला. पीडितेच्या कुटुंबियांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत कुणीही आम्हाला रोखू शकत नाही असा इशारा देत काँग्रेस पीडित कुटुंबाच्या पाठीशी असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. तसेच पीडित कुटुंबाचा आवाज कुणीही दाबू शकत नसल्याचे राहुल गांधी पुढे म्हणाले. राहुल गांधी व प्रियंका गांधी पीडित कुटुंबाच्या घरातून बाहेर पडताच, माध्यमांनी त्यांना घेरले. यानंतर प्रियंका गांधी यांनीही पोलीस अधिकाऱयांवर झालेल्या कारवाईप्रमाणे जिल्हाधिकाऱयांवरही कारावाई करण्याची मागणी केली. योगी आदित्यनाथ सरकारकडून गुन्हेगारीला प्रोत्साहन दिले जात असल्यामुळे अशा पद्धतीच्या घटना राज्यात वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला.