इंडिया ओपन बॅडमिंटन :प्रणॉय, अश्मिता, मालविका बनसोडचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दोनवेळची ऑलिम्पिक पदकविजेती पीव्ही सिंधू तसेच वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य मिळविलेला लक्ष्य सेन यांनी येथे सुरू असलेल्या योनेक्स सनराईज इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले.
या स्पर्धेत अग्रमानांकन मिळालेल्या सिंधूने आपल्याच देशाच्या अश्मिता चलिहाचाचा 21-7, 21-18 असा 36 मिनिटांच्या खेळात पराभव केला. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने एक सेटची पिछाडी भरून काढत आपल्याच देशाच्या एचएस प्रणॉयवर 14-21, 21-9, 21-14 असा संघर्षपूर्ण विजय मिळविला. सिंधूची उपांत्य लढत थायलंडच्या सहाव्या मानांकित सुपनिदा केटथाँगशी होणार आहे. सिंगापूरच्या तिसऱया मानांकित येओ जिया मिन हिने ताप आल्याने माघार घेतल्याने केटथाँगला पुढे चाल मिळाली.
तिसरे मानांकन मिळालेल्या लक्ष्य सेनची उपांत्य लढत मलेशियाचा एन्ग त्झे याँग किंवा आयर्लंडचा एन्हात एन्ग्युएन यापैकी एकाशी होईल. महिलांचा दुसरा उपांत्य सामना आकर्षी कश्यप व थायलंडची द्वितीय मानांकित बुसानन आँगबमरुंगफान यांच्यात होणार आहे. आकर्षीने आपल्याच देशाच्या मालविका बनसोडचा 21-12, 21-15 असा पराभव करून शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. मालविकाने याआधी सायना नेहवालला पराभवाचा धक्का दिला होता. पण त्या कामगिरीची पुनरावृत्ती तिला या सामन्यात करता आली नाही. बुसाननने अमेरिकेच्या लॉरेन लॅमचा 21-12, 21-8 असा पराभव केला.
सिंधू व अश्मिता यांच्यात यापूर्वी 2019 मध्ये वरिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये गाठ पडली होती. अश्मिताला शुक्रवारी लय मिळण्यात थोडा वेळ लागला. तिने दुसऱया गेममध्ये सिंधूला चांगला प्रतिकार केला. पण सिंधूला ती विजयापासून रोखू शकली नाही. त्याआधी पहिल्या गेममध्ये सिंधूने वर्चस्व राखत ब्रेकपर्यंत 11-5 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर सलग 10 गुण जिंकत तिने हा गेमही घेतला. दुसऱया गेममध्ये अश्मिताने चांगला परफॉर्मन्स देत सिंधूला 9-9 वर गाठले. पण सिंधूला ब्रेकवेळी केवळ एका गुणाची आघाडी मिळाली. नंतर सिंधूने 15-11 अशी मुसंडी मारली. पण अश्मिताला तिला 15-15 व गाठले. यानंतर मात्र सिंधूने खेळ उंचावत चार मॅचपॉईंट्स मिळविले. अश्मिताने त्यातील दोन वाचवले. पण सिंधूने अखेर बाजी मारत आगेकूच केली.

लक्ष्य सेन व प्रणॉय यांच्यातील लढत तोडीस तोड झाली. सेनने प्रारंभी वर्चस्व राखत 6-2 अशी आघाडी घेतल्यानंतर प्रणॉयनेही सूर गवसल्यानंतर सेनची आघाडी 12-10 अशी कमी केली आणि 15-14 अशी बढत घेतल्यावर हा गेमही जिंकला. दुसऱया गेममध्ये सेनने जोरदार मुसंडी मारत 12-5 अशी मोठी आघाडी घेतली आणि नंतर प्रणॉयला फारशी संधी न देता हा गेम जिंकून बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये प्रणॉयने 6-1 अशी आघाडी घेतली होती. पण ती त्याला टिकविता आली नाही आणि लक्ष्य सेनने मध्यंतराला 11-9 अशी बढत घेतली. नंतर पुढचे 11 पैकी 9 गुण घेत गेमसह सामना जिंकून आगेकूच केली.
पुरुष दुहेरीत इशान भटनागर व साई प्रतीक के. यांना मलेशियाच्या तिसऱया मानांकित आँग यू सिन व तेओ ई यी यांच्याकडून 7-21, 7-21 असा केवळ 19 मिनिटांत पराभव स्वीकारावा लागला. मिश्र दुहेरीत भारताच्या वेंकट गौरव प्रसाद व जुही देवांगन या आठव्या मानांकित जोडीला मलेशियाच्या चेन टँग जी व पेक येन वेई यांच्याकडून 10-21, 13-21 असा पराभव पत्करावा लागला. आणखी एक भारतीय जोडी नितिन एचव्ही व अश्विनी भट के. यांनाही सिंगापूरच्या ही याँग काइ टेरी व टॅन वेई हान यांच्याकडून 15-21, 19-21 अशी हार पत्करावी लागली.
सोनी नेटवर्कवर इंडिया ओपनचे प्रक्षेपण
सध्या सुरू असलेल्या ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे थेट प्रक्षेपण सोनी पिक्चर्स नेटवर्कवरून केले जाणार असल्याचे भारतीय बॅडमिंटन संघटनेने (बीएआय) जाहीर केले. कोरोनामुळे ही सुपर 500 स्पर्धा बंदिस्त स्टेडियममध्ये प्रेक्षकांविना खेळविण्यात येत असून यातील उपांत्यपूर्व फेरीपासून सामन्यांचे थेट प्रक्षेपण सोनी टेन 1 व सोनी लिव्ह वाहिनीवर केले जाणार आहे. मागील दोन वर्षी ही स्पर्धा कोरोनामुळे रद्द करण्यात आली होती.