बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप : अँगस, ऍक्सेलसेन यांना पराभवाचा धक्का, चिराग-सात्विक दुहेरीत विजयी
वृत्तसंस्था/ माद्रिद
स्पेनमधील हुएल्वा येथे सुरू असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेत विद्यमान विजेत्या भारताच्या पीव्ही सिंधूने मार्टिना रेपिस्कावर सरळ गेम्सनी विजय मिळवित दुसरी फेरी गाठली. याशिवाय लक्ष्य सेननेही दुसरी फेरी गाठली तर एचएस प्रणॉयने हाँगकाँगच्या एन्ग का लाँग अँगसला पराभवाचा धक्का दिला. दुहेरीत सात्विकसाईराज-चिराग शेट्टी यांना विजयासाठी संघर्ष करावा लागला.
दोन ऑलिम्पिक पदके मिळविणाऱया सिंधूने पहिल्या फेरीत स्लोव्हाकियाच्या मार्टिना रेपिस्काचा 21-7, 21-9 असा केवळ 24 मिनिटात पराभव केला. रेपिस्काकडून सिंधूला या सामन्यात फारसा प्रतिकारच झाला नाही. 2019 मध्ये ही स्पर्धा जिंकलेल्या सिंधूला येथे सहावे मानांकन मिळाले असून तिने रेपिस्कावर प्रारंभापासूनच वर्चस्व ठेवत 4-1 अशी आघाडी घेतली. रेपिस्काने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण सिंधूने हा गेम केवळ 10 मिनिटांत संपवला. दुसऱया गेममध्येही हाच सिलसिला चालू राहिला. ब्रेकवेळी सिंधू 11-1 अशी पुढे होती. हेच वर्चस्व कायम ठेवत तिने गेमसह सामनाही जिंकला.
पुरुष एकेरीत लक्ष्य सेनला मात्र दुसरी फेरी गाठण्यासाठी केन्टा निशिमोटोविरुद्ध संघर्ष करावा लागला. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये प्रथमच खेळणाऱया लक्ष्यने 15 व्या मानांकित जपानच्या निशिमोटोवर 22-20, 15-21, 21-18 अशी मात केली. ही झुंजार लढत एक तास 22 मिनिटे रंगली होती.
सोमवारी उशिरा झालेल्या लढतीत एचएस प्रणॉयने हाँगकाँगच्या आठव्या मानांकित अँगसला चकित करताना 13-21, 21-18, 21-19 असा विजय मिळविला. बिगरमानांकित प्रणॉयने पहिला गेम गमविला होता. पण नंतरच्या दोन गेममध्ये मुसंडी मारत त्याने जोरदार पुनरागमन करून सामनाही जिंकला. त्याची पुढील लढत मलेशियाच्या डॅरेन ल्यू याच्याशी होणार आहे.
तत्पूर्वी पुरुष दुहेरीत अरुण जॉर्ज व सन्यम शुक्ला यांना चीनच्या ओयु झुआन यी व झँग नान यांच्याकडून 15-21, 14-21 असा पराभव स्वीकारावा लागला. मिश्र दुहेरीत वेंकट गौरव प्रसाद-जुही देवांगण यांना डेन्मार्कच्या मथायस थायरी, माई सुरो यांनी 21-8, 21-4 असे सहज नमविले. याशिवाय उत्कर्ष अरोरा-करिश्मा वाडकर यांनाही संघर्षपूर्ण लढतीत जर्मनीच्या पॅट्रिक स्कीएल-फ्रान्सिस्का व्होकमन यांच्याकडून 20-22, 16-21 असा पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीतील अन्य एका सामन्यात मलेशियाच्या तान कियान मेंग-लई पेई जिंग यांनी भारताच्या सौरभ शर्मा-अनुष्का पारिख यांचा 21-8, 21-18 असा पराभव केला.
चिराग-सात्विकचा संघर्ष
मंगळवारी पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी-सात्विकसाईराज रनकिरेड्डी यांना विजयासाठी बराच संघर्ष करावा लागला. भारतीय जोडीला या स्पर्धेत आठवे मानांकन असून त्यांनी चिनी तैपेईच्या ली झे हुएई-यांग पो सुआन यांच्यावर मात केली. पहिल्या गेममध्ये भारतीय जोडीने फक्त पाच गेम गमविले. तरीही तैपेईच्या जोडीने जोरदार प्रतिकार करीत गेम लांबवला. चिराग-सात्विकने हा गेम 27-25 असा घेत आघाडी घेतली. दुसऱया गेममध्ये भारतीय जोडीने आपला खेळ उंचावत प्रतिस्पर्ध्यांना जास्त संधी मिळणार नाही, याची दक्षता घेत हा गेम 21-17 असा घेत 43 मिनिटात विजय साकारला.
ऍक्सेलसेनचे आव्हान समाप्त
जागतिक अग्रमानांकित व विजेतेपदाचा दावेदार मानल्या जाणाऱया डेन्मार्कच्या क्हिक्टर ऍक्सेलसेनला पहिल्याच फेरीत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. सिंगापूरच्या लोह कीन यू याने त्याला 14-21, 21-9, 21-6 असा धक्का दिला. अलीकडेच झालेल्या इंडोनेशिया ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऍक्सेलसेनने कीन यू याला हरवून जेतेपद मिळविले होते. त्याची परतफेड कीन यू याने येथे केली. ऍक्सेलसेनचा या वर्षातील हा चौथा पराभव आहे. या वर्षात त्याने ऑलिम्पिक सुवर्ण आणि सात अजिंक्यपदे मिळविली आहेत. सामन्यानंतर ऍक्सेलसेनने कीन यू याच्या खेळाचे कौतुक करीत त्याला शुभेच्छा दिल्या.