प्रतिनिधी / पणजी :
आज शुक्रवार, उद्या व परवा असे सलग तीन दिवस गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मान्सून चांगलाच सक्रिय झालेला आहे. त्याचबरोबर बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा प्रभाव पडला असून आणखी समुद्रातून आणि पूर्वेकडूनही गोव्यात पावसाचे प्रमाण वाढल्याने गोव्याच्या पूर्व भागात म्हणजेच सत्तरी, डिचोली तालुक्यात मोठय़ा प्रमाणात पावसाची शक्यता वाढली आहे.
यंदाच्या मोसमात पावसाने आपली वार्षिक सरासरी पूर्ण करूनही पावसाचा जोर पुन्हा वाढत आहे. त्यामुळे यावर्षी पाऊस द्विशतक पूर्ण करील, असा अंदाज आहे. दोन दिवस पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी पावसाचा जोर पुन्हा वाढला. जोरदार वाऱयाबरोबर पावसाचे ढग अरबी समुद्रातून पूर्वेच्या दिशेने सरकल्याने घाट विभागात पाऊस जादा पडणार आहे.
पणजीत आतापर्यंत 112 इंच पाऊस
गेल्या 24 तासात वाळपईत 2 इंच, म्हापसा, सांखळी, केपे व सांगे येथे प्रत्येकी 1 इंच, पेडणे, पणजी, जुने गोवे येथे पाऊण इंच, फोंडा, काणकोण मुरगाव येथे प्रत्येकी अर्धा इंच पावसाचे प्रमाण होते. आगामी 3 दिवस पावसाचे आहेत व मुसळधारपणे तो कोसळत राहणार असा इशारा वेधशाळेने दिला आहे. पणजीत आतापर्यंत 112 इंच पाऊस झालेला आहे.
राज्यातील नद्या नाले सध्या तुडूंब भरुन वाहत आहेत. धरणात एवढे प्रचंड पाणी झाले आहे की, मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग करणे भाग पडत आहे. सत्तरीत जादा पाऊस पडणे हे अंजुणे धरणाला धोकादायक ठरते. धरणाचे सध्या चारही गेट्स खुले करण्यात आलेले आहेत. जादा पाऊस पडला तर गेट आणखी मोठय़ा प्रमाणात उघडावे लागतात. दरवर्षी हे धरण सप्टेंबर अखेरच्या टप्प्यात भरले जाते. यावर्षी ते जुलै अखेरीसच भरले. सध्या धरण क्षेत्रात 140 इंच पाऊस झालेला आहे.