ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एका रुग्णवाहिकेला मोहोळ येथे भीषण अपघात झाला. या अपघातात रुग्णवाहिकेमधील तीन जण जागीच ठार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एका मृतदेहाला घेऊन जात असताना हा अपघात झाला. पुण्यावरुन हैदराबादकडे जात असताना मालवाहतूक ट्रकला रुग्णवाहिकेने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की यात गाडीचा चेंदामेंदा झाला, तर तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 10 जण जखमी झाले आहेत.
मोहोळ शहरातील कन्या प्रशालेसमोर हा अपघात झाला. रुग्णवाहिकेत 17 जण होते. हा अपघात शनिवारी पहाटे 3.45 ते 4 वाजण्याच्या दरम्यान झाला. जखमींना सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णवाहिकेतून एक कुटुंब नातेवाईकाचा मृतदेह गावी घेऊन चालले होते. मात्र, काळाने त्यांच्यावरच घाला घातला. ऐन दिवाळीत हा अपघात झाल्याने मोहोळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.