चिपळुणात मंदिराची दानपेटी फोडून 7 हजार रूपये लांबवले
चिपळूण
तालुक्यातील दहिवली खुर्द येथील श्री आई वरदान मानाई देवीच्या मंदिरातील दानपेटी फोडून 7 हजार रुपयांची रक्कम चोऊन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी तालुक्यातील विविध ठिकाणच्या मंदिरातील दानपेट्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार घडला असतानाच पुन्हा एकदा चोरट्यांनी ग्रामीण भागातील मंदिरातील दानपेट्यांना लक्ष्य केले आहे. तालुक्यातील दहिवली खुर्द येथे श्री आई वरदान मानाई देवीचे मंदिर आहे. फेब्रुवारी ते मार्च या 2 महिन्याच्या कालावधीत चोरट्याने या मंदिरातील सीसीटिव्ही कॅमेरे तोडून त्याचे नुकसान केले. त्यानंतर दानपेटी उचकटून त्यातील 7 हजार रुपयांची रक्कम चोरली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या बाबत सावर्डे पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल झाला.