ओटवणे माजी विद्यार्थी संघटनेची सामाजिक बांधिलकी
ओटवणे / प्रतिनिधी:
तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी घरात शिरून ओटवणे येथील गावकर आणि वरेकर कुटुंबियांना मोठा फटका बसला. या पुरामुळे या दोन्ही कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याचेही नुकसान झाले. त्यामुळे ओटवणे येथील माजी विद्यार्थी संघटनेने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने या पुरग्रस्त विद्यार्थ्यांना स्कूल बॅगसह शैक्षणिक साहित्याचे वितरण केले. ओटवणे देऊळवाडी येथील कु अभिषेक भिवसेन गांवकर, कु ओमकार रामदास गावकर हे दोन्ही विद्यार्थी सध्या दहावीत शिकत आहेत तर कापईवाडी येथील कु स्नेहा विठोबा वरेकर ही विद्यार्थिनी अकरावीत शिकत आहे. या तिन्ही विद्यार्थ्यांच्या घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे त्यांच्या स्कूल बॅगसह शैक्षणिक साहित्याचे नुकसान झाले.
माजी विद्यार्थी संघटनेने यापूर्वीही गावातील अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना तसेच समाजातील गोरगरीब व निराधारांना नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. याच उद्देशाने या पूरग्रस्त विद्यार्थ्यांना स्कूल बॅगसह शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. माजी विद्यार्थी संघटनेच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.